आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांचे मुद्दे घेऊन राहुल गांधी परतणार, या पाच आव्हानांचा करावा लागेल सामना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दोन महिन्यांच्या सुटीवरुन मायदेशी परतलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज भू-संपादन विधेयकाला विरोध करण्यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांच्या सभेला संबोधित करणार आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर इंदिरा गांधींप्रमाणे सक्रियता दाखवली आहे. आता राहुल गांधी रविवारी भू-संपादन कायद्याविरोधात उभे राहाताना दिसण्याची शक्यता आहे. सुटीवरुन परतल्यानंतर आता राहुल यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. गेल्या तीन वर्षांतील निवडणुकांमध्ये त्यांचा प्रभाव दिसलेला नाही, त्यामुळेच आता त्यांच्यासमोर कोणते आव्हान असणार आहे, हे महत्त्वाचे ठरत आहे.
राहुल गांधींसमोरील पाच मोठी आव्हाने
1 - मोठ्या प्रश्नांवर सक्रियता दाखवावी लागेल
1977 मध्ये काँग्रेसचा निवडणुकीत पराभव झाला होता, त्यानंतर इंदिरा गांधींनी शेतकऱ्यांसोबत स्वतःला जोडून घेत त्यांच्या प्रश्नावर सक्रिय आंदोलन केले होते. राहुल गांधी सुटीवर गेल्यानंतर तशीच सक्रियता सोनिया गांधी यांनी दाखवल्याचे पाहायला मिळाले. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात सर्व विरोधी पक्षांनी भू-संपादन विधेयकाविरोधात संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढला होता. मात्र, या आंदोलनात राहुल अनुपस्थित होते. आता त्यांना अशा मोठ्या मुद्यांवर कृती करावी लागणार आहे. आज (रविवार) दिल्लीतील रामलीला मैदानावर शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे, यात त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन पेटवले पाहिजे.
2 - संघटनेत स्वतःची भूमिक स्पष्ट करावी
राहुल गांधी काँग्रेस उपाध्यक्ष आहेत. हे सर्वांनाच माहित असले तरी, ते ठोस कार्यक्रम पक्षाला देताना दिसलेले नाही. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी पक्ष सोनिया आणि राहुल यांच्यामध्ये हेलकावे घेत असल्याचे म्हटले होते. ते म्हमाले होते, 'एकदा मी एक विषय घेऊन सोनिया गांधींकडे गेलो होतो तेव्हा त्यांनी मला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल यांना त्याबद्दल सांगण्यास सांगितले. मी राहुल यांच्याकडे गेलो तर ते म्हणाले, याचे उत्तर काँग्रेस अध्यक्षांकडे आहे. असे फारकाळ चालणार नाही. राहुल गांधी यांना भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यांना प्रत्यक्ष समोर येऊन प्रश्नांना भिडावे लागेल.'
3 - नेत्यांमध्ये ताळमेळ बसवावा लागेल
काँग्रेस पक्षांतर्गत एकवाक्यता नाही. पक्षातील नेते परस्पर विरोधी विधाने करत असतात. त्यांच्यात ताळमेळ साधणे गरजेचे आहे. पक्षाचे एक नेते संदीप दीक्षित म्हणतात, की सोनिया गांधींकडे पक्षाचे नेतृत्व असले पाहिजे. तर, दुसरे एक नेते मिलिंद देवरा यांना वाटते की आता पक्ष नेतृत्व राहुल गांधीकडे देण्याची वेळ आली आहे. यामुळे राहुल गांधी यांना पक्षातील अंतर्गत बाबी बाहेर न येऊ देता त्यावर तोडगा काढण्याची आणि नेत्यांमध्ये ताळमेळ साधण्याची महत्त्वाची जबाबदारी येऊन ठेपली आहे.
4 - पक्षात आपले नेतृत्व स्विकारार्ह्य करणे
तीनवेळा दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिलेल्या शीला दीक्षित यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते, की पक्षासमोरील सर्व आव्हाने आणि संकटांना तोंड देण्याची ताकद सोनिया गांधींमध्ये आहे. त्या कधीही आव्हानांना पाठ दाखवत नाहीत. याचा अर्थ काँग्रेस अजूनही सोनिया गांधी यांच्या करिष्म्यावर आवलंबून आहे. तर राहुल यांना पक्षात सोनियांइतकी मान्यता नाही. त्यामुळे राहुल यांना आपली विश्वासार्ह्यता वाढवावी लागणार आहे.
5 - बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणूक
सुटीवरून परतल्यानंतर आता राहुल गांधी पक्षकार्यात सक्रिय झाले तर त्यांच्यासमोर पहिले आव्हान बिहार आणि पश्चिम बंगाल विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे असणार आहे. बिहारमध्ये ऑक्टोबरमध्ये निवडणुका आहेत. येथे जनता परिवाराचे सदस्य लालू प्रसाद यादव आणि नितीशकुमार एकत्र आले आहेत तर, लोकजनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान आणि भाजप एकत्र आहे. बिहारनंतर पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये निवडणुका आहेत. 2017 मध्ये उत्तरप्रदेश विधानसभेचा रणसंग्राम सुरु होईल. येथे 2012 मध्ये राहुल गांधींनी निवडणूक मॅनेजमेंट केले होते.