नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे बुधवारी संसदेत आक्रमक रुप पाहायला मिळाले. सभागृहाच्या वेलमध्ये येऊन त्यांनी घोषणाबाजी केली. जातीय दंग्यांविरोधात चर्चेची मागणी करत राहुल गांधी यांनी इतर खासदारांसोबत घोषणाबाजी केली. काँग्रेसची मागणी होती, की उत्तर प्रदेश आणि देशाच्या इतर भागांमध्ये होत असलेल्या जातीय दंगलींवर सभागृहात चर्चा व्हावी. मात्र, लोकसभा अध्यक्षांनी त्यांना शांत राहाण्यास सांगतिले.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या सभागृहात बोलू न देण्याच्या आरोपावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले, 'जे सभागृहात कधीच बोलत नाहीत ते बोलू देत नसल्याबद्दल ओरड करत आहेत. खरे तर त्यांच्या पक्षांतर्गत कलहामुळे ते व्यथित झाले आणि आक्रमक झाले आहेत.'
सभागृहातून बाहेर आल्यानंतर कोणाचेही नाव न घेता राहुल गांधी पत्रकारांना म्हणाले, 'आमची चर्चेची मागणी होती मात्र, या सरकारला कोणतीही चर्चा नको आहे. देशात एक कल्ली राजकारण सुरु आहे. सभागृहात फक्त एकाच व्यक्तीला बोलण्याचा अधिकार आहे.' लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन पक्षपाती वागत असल्याचा आरोप करत ते म्हणाले, 'सभागृहामध्ये फक्त एकाच व्यक्तीचे ऐकले जात आहे.' राहुल गांधी यांना जेव्हा त्यांच्या आक्रमक शैलीबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले, 'याआधीही मी सभागृहाच्या कामकाजात भाग घेतला असून या मुद्यावर अनेकदा आवाज उठवला आहे.'
काँग्रेसने उत्तर प्रदेश आणि देशातील इतर भागांमध्ये सुरु असलेल्या जातीय दंगली आणि हिंसाचाराच्या घटनांवर चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्ताव दिला होता मात्र, लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन त्यांनी तो नामंजूर केला. यामुळे गोंधळातच सभागृहाचे कामकाज सुरु होते. काँग्रेसच्या या मागणीला यूपीएच्या घटक पक्षांनीही पाठिंबा दिला होता.
राहुल गांधींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह म्हणाले, 'पंतप्रधान जातीयवादी नाहीत किंवा हूकुमशहा देखील नाहीत.'
पुढील स्लाइडमध्ये वाचा, आक्रमक राहुल गांधीवर सोशल मीडियात आलेल्या प्रतिक्रिया. त्यासोबतच छायाचित्र आणि व्हिडिओच्या माध्यमातून पाहा, राहुल गांधींना कधी कधी आणि केव्हा राग अनावर झाला.