आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नॅशनल हेराल्ड प्रकरण - पीएमओ करतेय सुडाचे राजकारण : राहुल गांधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नॅशनल हेराल्डच्या निमित्ताने काँग्रेस आणि भाजपने बुधवारीही परस्परांवर आरोप-प्रत्यारोप केले. ‘हे सुडाचे राजकारण आहे. ते पीएमओ (पंतप्रधान कार्यालय) करत आहे,’ असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. त्याला उत्तर देताना संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले, ‘काँग्रेस संसदेतून न्यायपालिकेला धमकी देत आहे.’ दोन्ही पक्षांच्या या वादामुळे संसदेत कुठलेही कामकाज होऊ शकले नाही.

राहुल गांधी म्हणाले, ‘नॅशनल हेराल्ड प्रकरण १०० टक्के सूडाचे राजकारण आहे, हे निश्चित आहे. पीएमओ राजकीय सुडाच्या भावनेने काम करत आहे. त्यांची राजकारणाची हीच पद्धत आहे. आमचा न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे. अखेर काय होते ते पाहूया. सत्य समोर येईलच.’दुसरीकडे काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले,‘विरोधकांना घाबरवले जात आहे. आम्ही फक्त हेराल्ड प्रकरणाचा विरोध करत नाही, तर हा सरकारच्या वृत्तीला विरोध आहे. देशात दोन कायदे आहे. एक कायदा सत्ताधाऱ्यांसाठी, तर दुसरा विरोधी पक्षांसाठी. विरोधकांच्या विरोधात दडपशाही, हुकूमशाही आणि सुडाच्या राजकारणानुसार कारवाई केली जात आहे.’तृणमूलचे नेते सौगत राय यांनी या प्रकरणी काँग्रेसला पाठिंबा दिला. ते म्हणाले,‘हे सरकार सूडाच्या भावनेने काम करत आहे. पंतप्रधानांनी त्याला उत्तर द्यावे.’
सपा सरकारसोबत :
समाजवादी पक्ष या प्रकरणी सरकारसोबत आहे. सपाचे नेते रामगोपाल यादव म्हणाले,‘न्यायपालिकेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर संसदेचे काम होऊ न देणे चुकीचे आहे. संसदेचे कामकाज व्हायला हवे.’
केजरीवाल, ममता संसदेत :
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे दोघे बुधवारी संसदेत आले. दोन्ही नेते संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पाऊण तास होते. दोघांनीही आपल्या पक्षाच्या खासदारांव्यतिरिक्त आणि भाजप वगळून इतर खासदारांचीही भेट घेतली. सर्वांना भेटण्यासाठी आलो होतो. येण्याचे विशेष काही कारण नाही, अशी प्रतिक्रिया दोघांनीही दिली.
५०० लोकांचा आवाज ३० जण दडपताहेत : नायडू
लोकसभेत खरगेंच्या आरोपांना व्यंकय्या नायडूंनी उत्तर दिले. ते म्हणाले, ‘काँग्रेस संसदेद्वारे न्यायपालिकेला धमकी देण्याचे काम करत आहे. काँग्रेसचे ३०-४० जण संसदेत ५०० जणांचा आवाज दडपत आहेत.’ केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी म्हणाले,‘जर राहुल गांधी यांच्यात हिंमत असेल, ते इमानदार असतील तर पीएमओवर लावलेले आरोप सिद्ध करावे.’