आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्याबद्दल मला खूप आदर वाटतो; राहुल यांचे पंतप्रधानांना रातोरात पत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कलंकित लोकप्रतिनिधी वटहुकुमाविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी रातोरात पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्र पाठवून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. कठीण काळातील आपल्या सक्षम नेतृत्वाबद्दल मला प्रचंड आदर वाटतो, असे राहुल यांनी म्हटले आहे.

कलंकित आमदार, खासदारांना तत्काळ अपात्र ठरवणार्‍या कायद्याविरोधात शुक्रवारी राहुल गांधी यांनी भरपत्रकार परिषदेत सरकारविरोधात संताप व्यक्त केला होता. हा वटहुकूम म्हणजे मूर्खपणा असून तो तत्काळ फाडून टाकला पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी नाराजी प्रकट केली होती. पंतप्रधान अमेरिकेच्या दौर्‍यावर असताना राहुल यांंनी हे वादग्रस्त विधान केल्यामुळे त्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटले. पंतप्रधानांचा अनादर केल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली गेली. त्यामुळेच की काय राहुल यांनी रातोरात मनमोहन सिंग यांना अमेरिकेत पत्र पाठवले. आपल्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे, हे आपण जाणताच. एवढ्या कठीण परिस्थितीतही आपण अत्यंत कुशलतेने नेतृत्व करीत आहात. त्यामुळे या वादग्रस्त मुद्द्याबद्दल माझी तळमळ आपण समजू शकता, असे राहुल यांनी पत्रात म्हटले आहे. त्यानंतर सोनिया गांधी यांनीही पंतप्रधानांशी फोनवर संपर्क साधला.