नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणूकीची रणनीती ठरविण्यासाठी काँग्रेसशासित राज्यांच्या 12 मुख्यमंत्र्यांची आज (शुक्रवार) काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राहुल गांधी यांनी एका महिन्यात काँग्रेसशासित सर्व राज्यांमध्ये लोकायुक्तांची नियुक्ती करणे, स्वस्त धान्य वितरण प्रणाली व्यवस्थित करण्याचे निर्देश दिले आहेत. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधीपक्षावर जोरदार हल्ला केला.
ते म्हणाले, भ्रष्टाचार संपला पाहिजे अशा गप्पा सगळेच मारतात मात्र, जेव्हा त्याविरोधात ठोस पाऊल उचलण्याची वेळ येते, कायदा करण्याची गरज असते तेव्हा ते पुढे येत नाही. पत्रकार परिषदेत अधिक जास्त न बोलता जाता-जाता त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या संकटात वाढ केली. आदर्श बद्दल राहुल यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावर ते म्हणाले, माझे वैयक्तिक मत आहे की,
महाराष्ट्र सरकारने आदर्श घोटाळ्याच्या अहवालाचा फेरविचार करावा.
त्याआधी राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 12 मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते अजय माकन यांनी सांगितले. 15, रकाबगंज रोड येथे झालेल्या या बैठकीत आगामी लोकसभा निवडणूकीत कोणती आव्हाने असतील याचा विचार केला गेला.