आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi Wishes To Become Prime Minister Susilkumar Shinde

मुलायमसिंहानी उधळले काँग्रेसवर धोकेबाजीचे रंग; राहूल होणार पंतप्रधान - शिंदे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशात सगळीकडे धुळवड साजरी होत असताना समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह यादव यांनी काँग्रेस धोकेबाज पक्ष असल्याचे सांगत तिसरी आघाडीची मोर्चेबांधणी जोरात सुरू केली आहे. तर, आगामी निवडणुकीनंतर काँग्रेसलाच बहुमत मिळणार असल्याचा दावा गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. त्याचबरोबर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

मुलायमसिंह यादव यांनी पुन्हा एकदा आगामी निवडणुकीनंतर तिसरी आघाडीचे सरकार बनेल असा विश्वास व्यक्त केला आहे. सैफई येथे होळी उत्सवाच्या कार्यक्रमात ते म्हणाले, काँग्रेस धोकेबाज पक्ष आहे. जे आश्वासन ते (काँग्रेस) देतात ते कधीच पूर्ण करत नाहीत.
मुलायसिंह यांनी भलेही काँग्रेसला धोकेबाज म्हटले असले तरी, समाजवादी पक्षाच्या २२ खासदारांसह युपीए आघाडी सरकाराला त्यांचा पाठिंबा कायम आहे.

गेल्या काही दिवसांपासून निवडणुका लवकर व्हाव्या आणि तिसरी आघाडी सत्तेवर येईल असे वक्तव्य करत असलेले मुलायमसिंह यांनी पुन्हा एकदा आगामी लोकसभा निवडणुकीनंतर भाजप प्रणित एनडीए किंवा युपीए सरकार बनण्यात यशस्वी होणार नाहीत, असे म्हटले आहे. आता तिसरी आघाडीच सत्तेत येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह आणि राशिद आल्वी यांच्यानंतर गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राहुल गांधी आगामी पंतप्रधान असतील असे सुतोवाच केले आहे. भारतीय जवानांसोबत होळी साजरी करण्यासाठी जैसलमेर येथील भारतीय छावणीवर ते गेले होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

गृहमंत्री शिंदे यांच्याआधी दिग्विजय सिंह म्हणाले की, राहूल गांधी यांनी कधीच म्हटलेले नाही की, मी पंतप्रधान होणार नाही. आल्वी यांनी सांगितले की, राहूल गांधी देशाचे पंतप्रधान व्हावे ही पक्षातील सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळण्याची क्षमता त्यांच्यात आहे. आम्हाला विश्वास आहे की, ते नक्कीच पंतप्रधान होतील आणि देशाला पुढे नेतील.