आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RSSशी संबंधितानेे गांधीजींची हत्या केल्याचे आपण म्हटले होते- राहुल यांचे स्‍पष्‍टीकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या केल्याचा आरोप आपण कधीच केला नाही, तर आरएसएसशी संबंधित व्यक्तीने गांधीजींची हत्या केल्याचे आपण म्हटले होते, असे स्पष्टीकरण काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात दिले.

बदनामीच्या खटल्यात आरोपी म्हणून समन्स जारी करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या राहुल गांधी यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती आर. एस. नरिमन आणि न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या न्यायपीठासमोर सुनावणी झाली. निवडणूक प्रचारसभेत बोलताना संघटना म्हणून आरएसएसने गांधी हत्या केल्याचा आरोप आपण केला नाही, तर संघाशी संबंधित व्यक्तीने गांधी हत्या केल्याचे म्हटले होते, असा युक्तिवाद करत राहुल गांधी यांनी त्यांच्याविरोधातील बदनामीची तक्रार खारीज करण्याची मागणी केली आहे. राहुल गांधींनी संघावर गांधी हत्येचा आरोप केला नाही, तर संघाशी संबंधित व्यक्तीवर केल्याचे आम्हालाही वाटते, असे न्यायालयाने म्हटले आहे. यापूर्वी २७ जुलै रोजी या प्रकरणाची सुनावणी करताना राहुल गांधींना संघावर गांधी हत्येचा आरोप लावून निंदा करता येणार नाही. त्यांनी माफी न मागितल्यास त्यांच्याविरुद्ध खटला सुरू ठेवला जाईल, असे याच न्यायपीठाने म्हटले होते.

राहुल गांधी यांचे निवेदन रेकॉर्डवर घेतले तर तक्रारदार हे प्रकरण येथे संपवायला तयार आहे काय, अशी विचारणा न्यायपीठाने तक्रारदाराचे वकील यू. आर. ललित यांच्याकडे केली. या प्रकरणाची सुनावणी आता १ सप्टेंबर रोजी होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...