आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपर्काचा नवा राहुल फंडा...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लोकसभा निवडणुकांची चर्चा राजकारणाच्या गल्ल्यांना गरम खाद्य पुरवत असतानाच पक्षाचे नवे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राज्यांच्या खासदारांशी व्यक्तिश: संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. याचा एक भाग म्हणून त्यांनी अलीकडेच महाराष्ट्रातील काँग्रेस खासदारांशी चर्चा केली. या चर्चेचा परिपाक म्हणून खासदार आणि सरकार यांच्यात समन्वय साधण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. याशिवाय रखडलेल्या काही नियुक्त्या लवकरात लवकर करण्याचे घसघशीत आश्वासनही देण्यात आले. गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय स्तरावरील एवढा मोठा नेता लोकप्रतिनिधींना समोरासमोर भेटल्याचे हे पहिलेच उदाहरण....

महाराष्ट्रात गेली तीन टर्म राष्ट्रवादीच्या साथीने काँग्रेसचा संसार सुरू आहे. मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे राहिले असले तरी राज्याच्या जवळपास सगळ्या नाड्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या हातात असल्यामुळे अनेकदा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये कुरबुरी होण्याचा प्रसंग घडतो. उभय पक्षांमधल्या झुंजी राज्याच्या राजकीय पटलावर मनोरंजक ठरत असल्या तरी राज्याचा गाडा हाकण्याच्या दृष्टीने आणि पक्षाच्या प्रतिमेच्या दृष्टीने योग्य नसल्यामुळे बरेचदा दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते दिल्लीतून आपापल्या कार्यकर्त्यांचे कान पिळतात आणि झुंजीमुळे उडालेला धुरळा खाली बसतो. गेल्या चौदा वर्षांचा हा अनुभव. तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना या म्हणीचा साक्षात प्रत्यय देणाºया बºयाच घटना राज्याच्या पटलावर घडलेल्या लोकांनी पाहिल्या आहेत. नेत्यांचे मनोमिलन असण्यातच दोन्ही पक्षांचे हित असले तरी प्रत्यक्षात कार्यकर्ते मनाने एकमेकांसोबत नसल्यामुळे दोन्ही पक्ष एकमेकांना पाण्यात पाहतात हे उघड सत्य आहे. यामुळेच राहुल गांधी यांनी जेव्हा खासदारांशी थेट चर्चा केली, तेव्हा आगामी निवडणुकांत ‘एकला चालो रे’ची भूमिका घेणे कसे गरजेचे आहे हे बहुतेक खासदारांनी त्यांना सांगितले. आघाडीच्या संसाराच्या मर्यादा अर्थातच राहुल आणि त्यांच्या सल्लागारांनी तपासलेल्या असल्यामुळे खासदारांचे आघाडी-रुदन फारसे फळाला येणार नाही हे अर्थातच स्पष्ट आहे.

आदर्श घोटाळा प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना जावे लागल्यानंतर दिल्लीतून पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदी पाठवण्यात आले. मुख्यमंत्री चव्हाण यांची पंतप्रधान कार्यालयातील निर्विवाद कारकीर्द, प्रशासनातील अनुभव, राजकीय कौशल्य या बाबी नजरेआड करण्यासारख्या मुळीच नाहीत. उलट त्यांच्या स्वच्छ प्रतिमेने काँग्रेसच्या पाठीमागे लागलेला भ्रष्ट कारभाराचा डाग काही अंशी पुसला गेला. पण तरी खुद्द पक्षाच्या नेत्यांची कामे होत नाहीत ही बाब त्यांच्या विरोधात जाते. मुख्यमंत्री विरोधी पक्षाच्या युवा नेत्यांना वेळ देतात; पण पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनाही ताटकळावे लागते, अशी एक भावना त्यांच्याविरोधात निर्माण झाली. राज्यातील पक्षसंघटनेत मुख्यमंत्री चव्हाण यांच्याविरोधात उघड नाराजी असल्याचे लपून राहिलेले नाही. पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यापुढे अनेक माध्यमांतून ही नाराजी उघड झालेली आहे. मुख्यमंत्री आणि राज्यातील पक्षसंघटना यांच्यात सुसंवाद नसल्याचे राहुल गांधींपुढे सप्रमाण मांडण्यात आले. निवडणुका कोणत्याही क्षणी दारात येऊन उभ्या ठाकण्याची शक्यता असल्यामुळे राज्यात तत्काळ नेतृत्वबदल करणेही शक्य नाही. यामुळे अखेर समन्वय समितीची स्थापना करून काही प्रमाणात मुख्यमंत्र्यांना पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांना जोडण्याचा एक कार्यक्रम पक्षाच्या नव्या उपाध्यक्षांना द्यावा लागला.

दुसरीकडे खुद्द पक्षाचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्याविरोधातही असंतोष प्रकट झाला आहे. मोहन प्रकाश हे स्पष्टवक्ते आहेत. शिवाय नियोजनाचे एक वेगळे कौशल्य त्यांच्याकडे असल्यामुळे ही नाराजी फारशी फलद्रूप ठरणार नाही. पण अध्यक्षपदावाचून भिरभिरणारे मुंबई काँग्रेसचे काम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नवे अध्यक्ष नेमण्यात होत असलेला उशीर, राज्यात काही जिल्हा, तालुका पातळीवर रखडलेल्या नियुक्त्या याचा थेट परिणाम कार्यकर्त्यांचे मनोधैर्य ढासळण्यावर होत असल्याची तक्रार राहुल गांधींकडे झाली. ही तक्रार वरवर छोटी वाटत असली तरी ती नजरेआड करता येण्यासारखी नक्कीच नाही. सध्या राज्यात पक्षसंघटना विस्कळीत आहे. काही जिल्ह्यांत राष्ट्रवादी काँग्रेसने मुसंडी मारत काँग्रेसपुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे. या पार्श्वभूमीवर राहुल यांनी खासदारांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून संपर्काचा नवा सेतू निर्माण केला असला तरी तो किती मजबूत आहे हे आगामी काळात दिसून येईलच. सध्या तरी आमचे ऐकले म्हणून खासदार खुश आहेत.