आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल ५६ दिवसांच्या अज्ञातवासातून परतले, थाई एअरवेजच्या विमानाने दिल्लीत दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेसचे उपाध्यक्ष व युवा नेते राहुल गांधी ५६ दिवसांच्या अज्ञातवासानंतर देशात परतले आहेत. गेल्या २३ फेब्रुवारी रोजी त्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची अधिकृत परवानगी घेऊन सुटी घेतली होती. या सुटीच्या काळात असलेल्या त्यांच्या वास्तव्याबद्दल देशभर प्रचंड चर्चाही झाली होती. गुरुवारी अचानक थाई एअरवेजच्या विमानाने ते सकाळी सव्वाअकराच्या सुमारास दिल्लीत अवतरले.

राहुल परतणार असल्याचे फार कमी काँग्रेसजनांना माहीत होते. त्यामुळे विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी फारशी गर्दी नव्हती. दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी मात्र सोनिया गांधी, प्रियंका गांधी-वढेरा यांनी राहुल यांचे स्वागत केले.
१९ एप्रिलला शेतकरी मेळावा
राहुल यांच्या उपस्थितीत रविवारी रामलीला मैदानावर शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यात राहुल यांचे भाषण होईल. भूसंपादन अध्यादेशाला विरोध म्हणून हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
चव्हाणद्वयी दिल्लीत
पक्षाचे उपाध्यक्ष असलेले राहुल दिल्लीत परतणार असल्याची खबर मिळताच महाराष्ट्रातील काँग्रेसजनांतही उत्सुकता पसरली. दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण दिल्लीत दाखल झाले असून हे नेते राहुल यांची भेट घेतील. पक्षाच्या ध्येयधोरणाबद्दल या भेटीत चर्चा होईल.