आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandi Sad On Rajiv Gandhi Killers Will Walk Free

राजीव गांधींच्या मारेक-यांची सुटका होणार; जयललितांच्या निर्णयावर राहुल गांधी दु:खी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांची तुरुंगातून आता सुटका होणार आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी आज (बुधवारी) एक विशेष बैठक बोलावून याबाबत निर्णय घेतला. परंतु, जयललितांच्या या निर्णयामुळे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांन‍ी दु.ख व्यक्त केले आहे.

देशाच्या माजी पंतप्रधानांच्या मारेकर्‍यांना सोडून दिले जात असेल तर देशातील आम आदमीचे काय? त्याने सरकारकडे कोणती अपेक्षा करावी? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे, जयललिता सरकारला मारेकर्‍यांना तुरुंगातून सोडून देण्याचे अधिकार नसल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने राजीव गांधी यांच्या तीन मारेकर्‍यांच्या फाशीची शिक्षा माफ करत जन्मठेपेत बदलली आहे. फाशी माफीसाठी सांथन, मुरुगन व पेरारीवलन या तिन्ही मारेकर्‍यांनी सन 2000 मध्ये राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. त्यावर 11 वर्षांनी निर्णय झाला. हा विलंब अनावश्यक असल्याचे न्यायालयाने मान्य केले होते. सरन्यायाधीश पी. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील न्यायपीठाने 4 फेब्रुवारीला राखून ठेवलेला निकाल मंगळवारी दिला होता. या निकालावर द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांनी आनंद व्यक्त केला होता. एमडीएमके नेते वायको यांनी तिन्ही आरोपींना लवकर मुक्त करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री जयललिता यांनी विशेष बैठक घेऊन राजीव गांधींच्या मारेक-यांची जेलमधून सुटका करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

सांथन, मुरूगन, पेरारीवलन गेली 23 वर्षे तुरूंगात आहेत. तसेच सुप्रीम कोर्टाने त्यांची शिक्षा फाशीतून जन्मठेपेत केली आहे. जन्मठेप झालेल्या गुन्हेगारांना 14 वर्षे तुरुंगात काढावी लागतात. मात्र वरील आरोपींनी त्यापेक्षाही अधिक काळ तुरुंगात घालविल्याने त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.