नवी दिल्ली - राहुल गांधी यांनी आता पक्षाची धुरा हाती घ्यावी. ज्यांना याबाबत आक्षेप आहे त्यांनी पक्षसंघटनेच्या निवडणुका लढवाव्यात, असे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी म्हटले आहे.
दिग्विजयसिंह शनिवारी प्रसारमाध्यमांसोबत संंवाद साधताना म्हणाले की, काँग्रेसने नेहमीच तरुणांना नेतृत्वाची संधी दिली आहे, असे सर्वसामान्य काँग्रेसजनांचे मत आहे. या वक्तव्यांवर पक्षाचे ज्येष्ठ नेते व गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय माखनलाल फोतेदार म्हणाले की, दिग्विजय संकटाच्या या समयी फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत. यात त्यांचा वैयक्तिक स्वार्थ दडलेला आहे. हे दिग्विजय यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगत काँग्रेस नेते आनंद शर्मा म्हणाले,
सोनिया गांधी आमच्या प्रेरणस्रोत आहेत. राहुलही प्रेरणास्रोत आहेत व पक्षाचे भविष्य आहेत. दोन्हीही नेते पक्षासाठी गरजेचे आहेत.
तामिळनाडूत पक्षफुटीच्या उंबरठ्यावर : तामिळनाडू काँग्रेसचे नेते जी.के. वासन बंडखोरीच्या तयारीत आहेत. शनिवारी ते म्हणाले, मी ३ नोव्हेंबरला
आपल्या रणनीतीचा खुलासा करेन. वासन हे जी.के. मूपनार यांचे पुत्र आहेत.
राहुल यांच्या खात्यावर ५ विजय, ११ पराभव
राहुल हे काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. मार्च २०१२ पासून त्यांनी पक्षाची धुरा स्वीकारलेली आहे. तेव्हापासून आजवर अडीच वर्षांत १६ राज्यांत निवडणुका झाल्या. त्यापैकी ११ राज्यांत काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आहे. राहुल आपल्या पक्षाला केवळ पाचच राज्यांत विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरले. यंदाच्या लोकसभा निवडणुकांसोबत पक्षाने केंद्रातील सत्ताही गमावली.