नवी दिल्ली - रेल्वे प्रवासी भाडेवाढीच्या दणक्यानंतर आता रेल्वे खात्याने प्रवाशांना ‘सुखद धक्का’ देण्याची तयारी चालवली आहे. आगामी रेल्वे अर्थसंकल्पात यासाठी खास तरतुदी केल्या जाण्याची शक्यता आहे. प्रवासी डब्यांची रचना बदलून आसन व्यवस्था अधिक चांगली केली जाईल. याशिवाय डब्यातील साफसफाई आणि स्वच्छतेवरही अर्थसंकल्पात अधिक भर दिला जाण्याची शक्यता आहे. येत्या 8 जुलै रोजी रेल्वेमंत्री सदानंद गौडा अर्थसंकल्प सादर करतील. त्यांनी प्रामुख्याने रेल्वे सुरक्षा आणि सुविधा यावरच भर दिलेला असल्याने त्याचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात उमटू शकते.
प्रवासी डब्यांचे उत्पादन
अधिकाधिक लांब पल्ल्यांच्या गाड्यांची मागणी लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी चार हजार डब्यांचे उत्पादन करण्याचे लक्ष्य रेल्वेने ठेवले आहे.
डब्यांची सजावट
प्रवासी डब्यांच्या अंतर्गत रचनेत सुधारणांचा प्रस्ताव. नवीन अंतर्गत रचना असलेल्या बारा डब्यांची निर्मिती करून त्यांचा प्रायोगिक तत्त्वावर उपयोग करण्यात येणार आहे.
वातानुकूलित, साधे डबेही सुधारणार
25 एसी व बिगर नॉन एसी डब्यांच्या गाडीचा विचार. एसी डब्यांसाठी 38 लाख, नॉन एसीसाठी 23 लाखांचा खर्च अपेक्षित. रंगसंगतीच्या आढाव्यासाठी खासगी संस्थेची मदत.
डब्यांची ‘यांत्रिक’ साफसफाई
डबे व फलाटांच्या यांत्रिक साफसफाईचा प्रस्ताव. पेस्ट कंट्रोल उपचार यंत्रणा वापरणार. प्रवासी डब्यातील स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी प्रत्येक डब्यात एक मदतनीस ठेवला जाऊ शकतो.
(फोटो - संग्रहित छायाचित्र)