आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Railway Fare News In Marathi, Railway Ministry, Narendra Modi Government

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वे प्रवाशांना ‘बुरे दिन’, प्रवासी भाड्यात 14.2 टक्क्यांनी झाली वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ‘अच्छे दिन’ची आतुरतेने वाट पाहणा-या रेल्वे प्रवाशांसाठी मात्र सध्या ‘बुरे दिन’ आहेत. केंद्र सरकारने शुक्रवारी सर्वच श्रेणींच्या रेल्वे भाड्यात 14.2 टक्के आणि मालवाहतुकीच्या भाड्यात 6.5 टक्के वाढ केली. यामुळे ज्या वस्तूंची वाहतूक रेल्वेने होते त्या सर्वच आगामी काळात महाग होतील.

रेल्वे सूत्रांनुसार मूळ प्रवासी भाड्यात 10 टक्के वाढ करण्यात आली असून 4.2 टक्के इंधन मूल्य (फ्युएल अ‍ॅडजस्टमेंट कॉस्ट) म्हणून वाढवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सर्वच श्रेणींच्या भाड्यात समान 14.2 टक्के वाढ होईल. ही भाडेवाढही तातडीने म्हणजे शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली होती. मात्र, नंतर ती 25 जूनपासून लागू करण्याचे निश्चित झाले.

भाडेवाढ का?
1. रेल्वेला केवळ प्रवासी भाड्यात रोज 30 कोटी म्हणजे महिन्याकाठी 900 कोटींचा फटका बसत आहे. या भाड्यावरील सबसिडी 26 हजार कोटींवर पोहोचली आहे. या वाढीमुळे 8 हजार कोटींचा फटका भरून निघेल.
2. रेल्वेने ही अधिसूचना निवडणूक निकालांदिवशीच म्हणजे 16 मे रोजी काढली होती. 20 मेपासून ही भाडेवाढ लागू होणार होती.
3. रेल्वे सध्या आर्थिक अडचणीत आहे. अनेक नव्या योजना बंद पडल्या आहेत. प्रवाशांना सुविधा पुरवण्यासाठीही खात्याकडे पैसे नाहीत. यात विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही योगदान द्यावे, असे आवाहन रेल्वेमंत्र्यांनी केले आहे.
अशी आहे भाडेवाढ
1. एसी, स्लीपर तसेच पॅसेंजर गाड्यांच्या भाड्यात समान 14.2 टक्के वाढ. म्हणजेच 100 रुपयांमागे आता 114 रुपये लागतील.
2. आरक्षणासाठी आकारले जाणारे शुल्क व सुपरफास्ट सरचार्ज आणि सेवाकरासारख्या इतर शुल्कात बदल नाही.
3. भाडेवाढ 25 जूनपासून लागू. या तारखेनंतरच्या प्रवासाचे तिकीट आपण आरक्षित केले असले तरी वाढलेली रक्कम द्यावी लागेल.
रेल्वेत ती वसूल केली जाईल.

विरोधकांची टीका
या भाडेवाढीवर विरोधी पक्षांनी चौफेर टीका चालवली आहे. काँग्रेस, सपा, बसपा, जदयू आणि डाव्या पक्षांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. माजी रेल्वेमंत्री नितीशकुमार म्हणाले, ‘अर्थसंकल्पातही सरकारला ही घोषणा करता आली असती. मात्र, ही घाई कशामुळे?’

भाजपने केला बचाव
भाजप प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी भाडेवाढीचे समर्थन केले. रेल्वेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने व दर्जेदार सुविधा देण्यासाठी भाडेवाढ अपरिहार्य होती, असे ते म्हणाले.
9 जुलै रोजी रेल्वे अर्थसंकल्प मांडला जाण्याची शक्यता आहे.

सर्वांत मोठी भाडेवाढ
गेल्या 10 वर्षांतील ही सर्वांत मोठी रेल्वे भाडेवाढ आहे. रेल्वेमंत्री सदानंद गौडा व अरुण जेटलींनी भाडेवाढीचे संकेत दिले होते. फक्त पंतप्रधानांच्या मंजुरीसाठी घोषणा अडली होती.
अशा सोसाव्या लागतील भाडेवाढीच्या झळा.... 100 रुपयांचे तिकीट 114 रुपयांवर
औरंगाबाद । रेल्वे भाडेवाढ झाल्याने आता नियमित प्रवास करणा-या विद्यार्थी व चाकरमान्यांसह सामान्य नागरिकांना झळा सोसाव्या लागणार आहेत.
औरंगाबाद मुंबई
स्लिपर क्लास : 183 रु. नवीन 209 रु.
टू एसी : 700 रु. नवीन भाडे 800 रु.
थ्री एसी : 485 रु. नवीन भाडे 554 रु.
साधारण : जुने 105 रु. नवीन-120 रुपये
औरंगाबाद-सिकंदराबाद
स्लीपर : जुने 240 रु. नवीन 274 रु.
थ्रीएसी : जुने 639 रु. नवीन 730 रु.
टू एसी : जुने 922 रु. नवीन 1053 रु.
साधारण जुने : 135 रु. नवीन-154 रु.
औरंगाबाद-दिल्ली
स्लीपर : जुने 471 रु. नवीन 538 रु.
टूएसी : जुने 1804 रु. नवीन 2060 रु.
थ्री एसी : जुने 1228 रु. नवीन-1403 रु.
साधारण 290 रु. नवीन-331 रु.
औरंगाबाद-दादर जनशताब्दी एक्सप्रेस:
सेकंड सिटींग
जुने 120 नवीन -137 रु.
एसी चेअर कार
जुने 408 रु. नवीन 466 रु.
औरंगाबाद जालना पॅसेंजरचा दर पूर्वी 15 रुपये होता आता 20 रुपये होईल.

हा तर पूर्वीच्या सरकारचा निर्णय
आम्ही नवीन कोणताच निर्णय घेतलेला नाही. यूपीए सरकारमधील रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खारगे यांचाच हा प्रस्ताव होता. तोच आम्ही फक्त लागू केला. रेल्वेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हे आवश्यक होते.
सदानंद गौडा, रेल्वेमंत्री

बुरे दिन अच्छे थे...
लोक तुमच्या युक्तिवादावर हसतील. आम्ही जे करत होतो तेच मोदी सरकारला करायचे होते तर लोकांनी तुम्हाला सत्ता कशाला दिली? तुमच्या अच्छे दिनपेक्षा लोकांना आमचे बुरे दिन चांगले होते.
- राशिद अल्वी, काँग्रेस प्रवक्ते