आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway Recruitment Scam Pavankumar Bansal CBI Investigation

रेल्वेतील लाचखोरी: बन्सल सीबीआयच्या जाळ्यात, तब्बल सहा तास चौकशी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- रेल्वेतील लाचखोरी प्रकरणी माजी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांचे पुतणे विजय सिंगला आणि रेल्वे बोर्डाचे सदस्य महेशकुमार यांचा समावेश असलेल्या या प्रकरणाच्या चौकशीचा फास मंगळवारी अखेर बन्सल यांच्यापर्यंत पोहोचला. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बन्सल यांची मंगळवारी तब्बल सहा तास चौकशी केली. या घोटाळ्यात बन्सल यांची काही भूमिका आहे काय, याची चाचपणी करण्यासाठी ही चौकशी करण्यात आली.
मीडियाचा ससेमिरा चुकवण्यासाठी बन्सल यांना सीबीआय मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरावरील विश्रामगृहावर सकाळी 11 वाजता बोलावून घेतले. सायंकाळी 6.45 वाजेपर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली. या कालावधीत त्यांना जेवणासाठी केवळ तासाचा ब्रेक देण्यात आला. रेल्वेतील महत्त्वाचे पद मिळवून देण्यासाठी महेशकुमार यांच्याशी दहा कोटी रुपयांचे डील केल्याप्रकरणी लाचखोरीच्या 90 लाख रुपये रकमेसह सिंगला याला 3 मे रोजी कुमार याच्यासह अटक केली होती.

पुतण्याने केलेले प्रताप अखेर आले काकांच्या अंगलट
पुन्हा चौकशीची शक्यता
बन्सल यांना पुन्हा चौकशीला बोलावण्यात येण्याचीही शक्यता आहे. मात्र सीबीआयने गोळा केलेल्या पुराव्यांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारच्या चौकशीत त्यांनी दिलेल्या उत्तरांची छाननी करूनच त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

काय केली चौकशी?
सीबीआयने चौकशीदरम्यान बन्सल यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. महेशकुमार यांच्याबरोबर झालेल्या बैठका, रेल्वे बोर्डाचे सदस्य म्हणून त्यांना देण्यात आलेली पदोन्नती आणि पश्चिम विभागाचे महाव्यवस्थापक म्हणून त्यांच्याकडे सोपवण्यात आलेला अतिरिक्त पदभार यासंबंधीचे अनेक प्रश्न बन्सल यांना विचारण्यात आले. फोन कॉल्सचा तपशील, संभाषण दाखवत तुमच्याशी चर्चा केल्याशिवाय सिंगला पदोन्नतीची हमी देऊ शकेल असे वाटत नसल्याचे सीबीआयने बन्सल यांच्या लक्षात आणून दिले.

1000 फोन कॉल्सची चौकशी
या लाचखोरी प्रकरणात सीबीआयने गेल्या दोन महिन्यांत तब्बल महेशकुमार आणि सिंगला यांच्यातील 1000 फोन कॉल्सचा तपशील धुंडाळला आहे. या प्रकरणी आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.

16 एप्रिल रोजी झाली भेट : महेशकुमार याला आपण कधीही भेटलो नाही, असा दावा बन्सल यांनी केला होता. मात्र गेल्या एप्रिल महिन्यात बन्सल आणि महेशकुमारची मुंबईत भेट झाल्याचे पुरावेच सीबीआयने गोळा केले आहेत. या चौकशीत सीबीआयने त्याचीही खातरजमा करून घेतली. मात्र बन्सल यांनी सर्वच आरोप फेटाळून लावत सिंगला आणि कुमार यांच्यात झालेल्या डीलबाबत आपणास काहीही माहिती नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले.
आरोप काय? : महेशकुमार यांनी रेल्वे बोर्डाचे सदस्य म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर पश्चिम विभागाच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त पदभार मिळवण्यासाठी बन्सल यांचे पुतणे सिंगला यांना 90 लाख रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. ही रक्कम रेल्वे बोर्डाच्या सदस्यपदी (इलेक्ट्रिकल) बढती मिळवण्यासाठी कुमार आणि सिंगला यांच्यात झालेल्या 10 कोटी रुपयांच्या कराराचाच भाग होती, असा आरोप आहे.