नवी दिल्ली - रेल्वेची भाडेवाढ भाजप सरकारच्या अंगलट येण्याचे चित्र असल्याने यावर फेरविचार केला जात आहे. 8 जुलै रोजी होणार्या रेल्वेच्या अर्थसंकल्पात किंवा त्याआधीच भाडेवाढ कमी करण्याचा निर्णय घेतला जाईल हे मात्र स्पष्ट केले नसले तरी देशातील जनतेला दिलासा देऊ, असा विश्वास रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना दिला आहे.
मुंबईत काँग्रेसने रेल्वेच्या भाडेवाढीविरुद्ध आंदोलन केले, ही भाडेवाढ कमी झाली तर त्याचे श्रेय काँग्रेसला मिळू नये यासाठी आज महायुतीच्या लोकप्रतिनिधींनी रेल्वेमंत्री गौडा यांची भेट घेऊन, रेल्वे भाडेवाढ कमी करून मुंबईतील लोकांना दिलासा द्यावा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्याचे विपरीत परिणाम दिसतील याकडे लक्ष वेधले. केंद्रीय ऊर्जामंत्री (स्वतंत्र प्रभार) पीयूष गोयल, भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि रिपाइंचे खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने ‘हेच का अच्छे दिन?’ असे लोक आम्हास विचारणा करीत असल्याचेही रेल्वेमंत्र्यांना सांगितले. कपिल पाटील, अरविंद सावंत, किरीट सोमय्या, गजानन कीर्तिकर, आशिष शेलार, राजन विचारे, श्रीकांत शिंदे, पूनम महाजन, गोपाळ शेट्टी, रवींद्र चव्हाण यांचा शिष्टमंडळामध्ये समावेश होता.
मुंबईत लोकलने प्रवास करणार्यांचा खिसा कापण्याचा हा निर्णय आहे. सेकंड क्लासच्या पासवर 290 रुपये वाढ आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांवर 14.2 टक्के वाढ ही प्रवाशांना ‘अच्छे दिन आने वाले हैं’ याचा विपरीत अनुभव देणारी आहे. रेल्वेमध्ये स्वच्छता, वातानुकूलित प्रतीक्षालये, स्वच्छ शौचालये आदी सोयी उपलब्ध करून देण्याची मागणी शिष्टमंडळाने रेल्वेमंत्र्यांकडे केली.
टप्प्याटप्प्याने भाडेवाढीचा विचार
मुंबईतील लोकांच्या भावनांचा विचार करून लवकरच चांगली बातमी देऊ, असे आश्वासन रेल्वेमंत्री गौडा यांनी दिले, तर भाडेवाढीचा प्रस्ताव संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमधील रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी तयार केला होता. मात्र, लोकसभा निवडणुका असल्याने काँग्रेस सरकारने रेल्वे भाडेवाढ केली नाही. भाजप सरकारला लोकांवर अन्याय करायचा नाही. रेल्वेमध्ये सुधारणा होणे अपेक्षित असल्याने रेल्वेने हे पाऊल उचलले. हा राजकीय निर्णय नव्हता, असे रेल्वेमंत्री गौडा यांनी स्पष्ट केले. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे विभाग आता टप्प्याटप्प्याने भाडेवाढ करण्याचा विचार करीत आहे.