आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे काढणार प्रवाशांच्या किमती वस्तूंचा विमा, ऑनलाइन तिकिटे बुक करणा-यांनाच लाभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रेल्वे प्रवासात सामान, मोबाइल फोन अथवा इतर मौल्यवान वस्तू हरवल्या अथवा चोरीला गेल्यास नशिबाला दोष देऊन गप्प बसण्याची वेळ प्रवाशांवर येणार नाही. आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून ई- तिकीट बुक केल्यास प्रवाशांच्या सामानाचा विमा उतरवण्याची योजना इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने(आयआरसीटीसी) तयार केली आहे.

‘बॅगेज इन्शुरन्स’ या योजनेसाठी आयआरसीटीसी न्यू इंडिया अॅशुरन्स या कंपनीशी करार करणार असून दोन्ही कंपन्यांमध्ये त्यासाठी चर्चा सुरू आहे. आयआरसीटीसीच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, सामानाचा विमा काढायचा की नाही हा पर्याय प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. ही योजना अनिवार्य नाही. प्रवासादरम्यान वैद्यकीय सेवेची गरज भासली तर तीही उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. दररोज २० लाख प्रवासी रेल्वेने प्रवास करतात आणि त्यापैकी ५२ टक्के ऑनलाइन तिकिटे बुक करतात. त्यापैकी अनेक प्रवासी विमा योजनेचा पर्याय स्वीकारतील अशी आमची अपेक्षा आहे. प्रवासी आणि आयआरसीटीसी या दोघांसाठीही ही विन-विन परिस्थिती असेल.
अशी आहे योजना
- लॅपटॉप, मोबाइल फोन अथवा इतर मौल्यवान वस्तूंचा विमा उतरवता येईल.
- या वस्तू अथवा सामान हरवल्यास किंवा चोरी झाल्यास प्रवासी विम्यासाठी दावा करू शकतील.
- प्रवासाचे अंतर आणि कुठल्या वर्गाने प्रवास करणार यावर विमा हप्ता अवलंबून राहील.
ई-केटरिंग सुविधांचा विस्तार
ऑनलाइन तिकिटे बुक करणा-या रेल्वे प्रवाशांना सध्या काही विशिष्ट गाड्यांमध्ये आणि मार्गांवर ई-केटरिंगची सुविधा मिळते. ही सुविधा आणखी काही गाड्यांमध्ये सुरू होणार आहे.
मदतीचाही हात...
प्रवासी आणि पर्यटकांना हमाल उपलब्ध करून देणे, गाड्यांच्या सद्य:स्थितीची माहिती देणे, घरी अथवा हॉटेलपर्यंत सोडण्यासाठी टॅक्सी पुरवणे अशा सेवा सध्या ऑनलाइन तिकिटे बुक करणा-या प्रवाशांना मिळतात. सध्या दिल्ली, मुंबई आणि कोलकाता या महानगरांतील स्थानकांवर प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू आहे. आता सर्व महत्त्वाची स्थानके, रेल्वेमार्गावरील पर्यटन स्थळांवर ती सुरू होणार आहे.