आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अच्छे दिन’चा शिडकावा : मान्सून उत्तरेत दाखल, नागरिकांना दिलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महागाईमुळे पिचलेल्या नागरिकांच्या संकटात लांबलेला मान्सून संकटात भर घालतो की काय अशी भीती व्यक्त होत असतानाच दिल्लीत गुरुवारी मान्सूनने वर्दी दिली. चार दिवस उशिरा का होईना पाऊस दाखल झाल्याने निसर्गनिर्मित ‘अच्छे दिन’ सुरू झाले. यामुळे असह्य उकाड्याने वैतागलेल्या दिल्लीकरांना दिलासा मिळाला. उत्तर भारतात अनेक ठिकाणी पाऊस पडल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला.

दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागांत मान्सूनने हजेरी लावली. बुधवारी सायंकाळपासूनच या भागात पाऊस पडण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याचे (आयएमडी) संचालक बी. पी. यादव यांनी दिली. हवेमध्ये पुरेशी आर्द्रता होती. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही बाजंूकडून वारे होते. उत्तर भारतातील मान्सूनच्या आगमनाचे हे सुचिन्ह आहे, असे यादव म्हणाले.

म.प्र.त आठवडाभरात दाखल होणार
मध्य प्रदेश आणि गुजरातसारख्या काही ठिकाणी 10 ते 15 जुलैदरम्यान मान्सून दाखल होणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात या दिवसांत पाऊस पडत नाही. जून महिन्याच्या आकडेवारीनुसार गुजरातमध्ये 91 टक्के कमी पाऊस पडला. बुंदेलखंडमध्ये अद्याप मोसमी पाऊस आला नाही. तेथे 16-17 तारखेपर्यंत तो येणे अपेक्षित आहे.

दिल्ली, हरियाणा आणि चंदिगडमध्ये पाऊस
जून महिन्यात संपूर्ण देशात 42 टक्के कमी पाऊस पडला. मात्र, उर्वरित दिवसांत अपेक्षित पाऊस पडेल अशी आशा आयएमडीने व्यक्त केली आहे. बुधवारी मध्य आणि वायव्य भारतात तुरळक सरी कोसळल्या. पंजाब, उत्तराखंडमध्ये जास्त, तर दिल्ली, हरियाणा आणि चंदिगडमध्ये सामान्य मान्सून बरसला. मान्सून वेरावल, सुरत, नाशिक, वाशीम, दमोह, लखनऊ, बरेली, अंबाला आणि अमृतसर या भागांतून मार्गक्रमण करेल.

29 जून मान्सूनची तारीख
दिल्लीत 29 जून रोजी नैर्ऋत्य मान्सून दाखल होत असतो. मात्र, तरीही मान्सूनला विलंब झाला असे म्हणता येणार नाही, असे आयएमडीचे महासंचालक एल. एस. राठोर यांनी सांगितले. 29 जून रोजी मान्सून येत असला तरी या तारखेत एक आठवडा मागेपुढे फरक पडतो. राजस्थानच्या बिकानेरमध्ये मान्सून लवकर येतो, मात्र साधारण 15 जुलैदरम्यान तेथे पाऊस पडत असल्याचे राठोर म्हणाले.

पारा घसरला
नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या आगमनासोबतच राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागांतील तापमान घसरले. दिल्लीत सकाळी 8.30 ते 5.30 दरम्यान 5.5 मि.मी. पाऊस पडला. येथे 32.7 अंश दिवसाचे तापमान नोंदवण्यात आले. बुधवारी 36.6 अंश सेल्सियस तापमान नोंदवले होते.

(फोटो - दिल्लीत पाऊस सुरू असताना राष्ट्रपती भवन परिसरात टिपलेले छायाचित्र)