आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajnath Singh Advise To Uddhav Try To Attempt Mns Joins In Mahayuti

मनसेला महायुतीत घेण्याचा प्रयत्न करा- राजनाथसिंहांच्या सल्ल्यावर उद्धवांचे मौन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांची आज दिल्लीत भेट घेतली. दिल्लीत सुमारे 40 मिनिटे या दोघांची भेट चालली. राज्यात महायुती व लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचे कळते. याचबरोबर महायुतीत मनसेला घेण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला राजनाथ सिंह यांनी उद्धव यांना दिला. मात्र, या प्रश्नावर उद्धव यांनी कोणतेही उत्तर न देता मौन बाळगणे पसंत केले. महाराष्ट्रात सलग 15 वर्षे सत्तेवर असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला खाली खेचण्याची संधी महायुतीला आहे. मात्र, या महायुतीत मनसे हा महत्त्वाचा फॅक्टर सहभागी नसल्याने मतविभागणी होण्याचा धोका असल्याचे दिसून येते.
गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मनसेच्या प्रभावामुळे मुंबईत महायुतीचा सुपडासाफ झाला होता. विधानसभेच्या निवडणुकीतही मुंबई-ठाणे, पुणे-नाशिक टप्प्यासह राज्यभर तब्बल 113 जागांवर मनसेमुळे भाजप-सेनेचे उमेदवार पडले होते. त्यामुळे सत्तेसाठी पराकोटीचे प्रयत्न करीत असलेला भाजप मनसेला महायुतीत सामील करून घेण्यासाठी पहिल्यापासून प्रयत्नशील आहे. त्यासाठी भाजपने उद्धव ठाकरे यांनाही काही मुद्दे पटवून दिले. त्यावर उद्धव यांनी राज यांना सामनातून एका हाताने टाळी वाजत नसल्याचे अप्रत्यक्षरित्या महायुतीचे आमंत्रण दिले होते. मात्र राज यांनी टाळी घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर उद्धव यांनी मनसेशी कोणत्याही स्थितीत युती न करण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र गेल्या आठवड्यात राज ठाकरे यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींवर यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले. त्यानंतर पुन्हा एकदा भाजपच्या नेत्यांना राज ठाकरेंची ताकद काय आहे ते कळाले. त्यामुळेच आज उद्धव ठाकरे यांनी राजनाथसिंह यांची भेट घेतली. तेव्हा मनसेला महायुतीत घेण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला देत चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र मागील वेळी टाळी मागून तोंडावर पडलेल्या उद्धव यांनी सावध पवित्रा घेत राजनाथ सिंहांच्या प्रश्नावर मौन बाळगणे पसंत केले आहे.