आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॅस्ट्रोंच्या अंत्यसंस्कारास राजनाथसिंह जाणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - क्युबाचे माजी अध्यक्ष आणि क्रांतिकारी नेते फिडेल कॅस्ट्रो यांना सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी भारतीय शिष्टमंडळ जाणार असून, त्याचे नेतृत्व गृहमंत्री राजनाथसिंह करतील. शिष्टमंडळात काँग्रेस, डावे पक्ष आणि इतर काही पक्षांचे प्रतिनिधीही असतील. कॅस्ट्रो १९७३ आणि १९८३ असे दोन वेळा भारतात आले होते. शिष्टमंडळ मंगळवारी हवानाला रवाना होेईल आणि गुरुवारपर्यंत परत येईल.
दरम्यान, क्युबात फिडेल कॅस्ट्रो यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी लोक क्रांती चौकात गोळा झाले. फिडेल यांचे पार्थिव शरीर मिरवणुकीने १२०० किमी दूर सॅँटियागो द क्युबा येथे नेले जाईल. तेथेच चार डिसेंबरला त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.
येमेनच्या माजी अध्यक्षांनी युनोकडे मागितली मदत : येमेनचे माजी अध्यक्ष अली अब्दुल्ला सालेह यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे कॅस्ट्रो यांच्या अंत्यसंस्काराला जाण्याची परवानगी मागितली आहे. सालेह यांना २०११ मध्ये जनतेने सत्तेतून हटवले होते. एकेकाळी दहशतवादविरोधी अमेरिकी मोहिमेचा भाग असलेल्या सालेह यांच्यावर सध्या सुरक्षा परिषदेने दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपावरून अनेक निर्बंध लावलेले आहेत.
पुतिन यांचे अनिश्चित
अमेरिका खंडात फिडेल कॅस्ट्रो हे सोव्हिएत संघाचे (नंतरचा रशिया) एकमेव सहकारी होते. रशियात क्रेमलिनने म्हटले आहे की, अध्यक्ष पुतिन क्युबाला जाणार की नाही हे अजून निश्चित नाही.

उत्तर कोरियात शोक
जगापासून वेगळे पडलेल्या उत्तर कोरियात फिडेल कॅस्ट्रो यांच्या निधनानिमित्त शोक म्हणून ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आले आहेत. हुकूमशहा किम जोंग यांनी फिडेल यांना उत्तर कोरियाचा जवळचा सहकारी संबोधले. देशाचा सर्वोच्च सन्मान फिडेल यांना देण्यात आलेला आहे. किम यांचे नजीकचे सहकारी आणि सत्तारूढ पक्षाचे उपाध्यक्ष अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी हवानाला रवाना झाले आहेत. लोकांनी रेल्वे स्थानके आणि चौकांत फिडेल यांच्या छायाचित्रांना श्रद्धांजली अर्पण केली.
बातम्या आणखी आहेत...