आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rajnath Singh Says Govt Will Not Rest Till Dawood Ibrahim Is Brought Back To India

दाऊदला भारतात आणल्याशिवाय राहणार नाही : राजनाथ यांचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेचा सूत्रधार आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्येच असल्याची खात्रीशीर माहिती आमच्याकडे आहे. त्यामुळे पाकिस्तानवर दबाव टाकून कोणत्याही परिस्थितीत त्याला भारतात आणणारच, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी लोकसभेत सांगितले.

‘दाऊद पाकिस्तानमध्येच आहे, अशी खात्रीशीर माहिती आमच्याकडे आहे. त्याबाबतचे सर्व पुरावे पाकिस्तानला देण्यात आले आहेत. दाऊदचा पाकिस्तानी पासपोर्ट आणि त्याचा पत्ता याची माहिती वेळोवेळी पाकला देण्यात आली. तरीही त्या देशाने पुढे काहीच केले नाही. मात्र, पाकिस्तानवर सर्व प्रकारे दबाव टाकून त्याला भारतात आणणारच,’ असे राजनाथ सिंह यांनी ठणकावून सांगितले. काही दिवसांपूर्वी दाऊदच्या ठावठिकाण्याची माहिती नाही, असे लेखी उत्तर केंद्रीय गृह राज्यमंत्री हरिभाई पार्थीभाई पटेल यांनी लोकसभेत दिले होते. त्यानंतर विरोधकांनी सरकारवर भूमिका बदलल्याची टीका करत भाजपची चांगलीच कोंडी केली होती. टीकेचा हा भडिमार थांबवण्यासाठी राजनाथ सिंह यांना सोमवारी लोकसभेत हे निवेदन करावे लागले. पटेल यांच्या वक्तव्यामुळे देशभर संभ्रम निर्माण झाल्यानंतर राजनाथ यांनी दाऊदला भारतात आणण्याची हमी देत यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला असला तरी नेमक्या कोणता मार्ग यासाठी अवलंबणार हे मात्र त्यांनी सांगितले नाही.

प्रत्यार्पण का नाही?
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेनेही दाऊदविरुद्ध नोटीस बजावली आहे. त्याचे पाकिस्तानी पासपोर्ट, पत्ते व इतर कागदपत्रांसंबंधी माहिती तसेच इतर काही महत्त्वपूर्ण दस्तऐवज या कामी महत्त्वाचे ठरणार आहेत. मात्र, मुळात पाकिस्तानच ते मुद्दाम दडवून ठेवत असल्याचे राजनाथ म्हणाले.

रेड कॉर्नरसाठी अडचणी
दाऊदविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस काढावयाची असली तरी पाकने यात हुशारी केली आहे. दाऊदबद्दलची कोणतीही माहिती पाकिस्तानने कोणत्याही विमानतळावर दिलेली नाही. त्यामुळे अशी नोटीस काढली तरी दाऊद नेमका आहे कोण, दिसतो कसा हे जगभरातील कोणत्याही विमानतळावरील अधिकाऱ्यांना कळू शकणार नाही.

पुढील स्लाइडवर वाचा, दाऊद पाकिस्तानात नाहीच : पुन्हा उलट्या बोंबा