आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raju Shetty Attacked Ministers Over FRP Of Sugercane

..तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, ऊस परिषद राजू शेट्टींचा ‘घरचा अाहेर’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - ‘उसाला एफआरपी देण्यासाठी साखर कारखान्यांना पाच डिसेंबरपर्यंतंची मुदत दिली आहे. जर त्यानंतरही साखर कारखानदारांची मनमानी सुरू राहिली तर कारखाने तर बंद करूच, शिवाय त्यांच्यावर कारवाई न करणाऱ्या राज्य शासनातील मंत्र्यांनाही रस्त्यावर फिरू देणार नाही,’ असा खणखणीत इशारा भाजपचा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला. शुक्रवारी जयसिंगपूर येथे आयोजित १४ व्या ऊस परिषदेत शेट्टींसह सर्वच वक्त्यांनी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांबरोबरच फडणवीस सरकारचाही उद्धार केला.

विक्रमसिंह मैदानावर आयोजित ऊस परिषदेत शेट्टी म्हणाले की, ‘शेती उत्पादनाला आधारभूत किंमत मिळत नसल्याने हा व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. आत्महत्या केलेल्या २७ शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वीकारलेली अाहे.

साखर कारखानदारांकडून उसाला हमी भाव वेळेत देण्याबाबत कार्यवाही झाली नाही तरीही शासनही त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कुचराई करते; परंतु यंदाच्या हंगामात साखर कारखानदारांची मनमानी चालू देणार नाही. गेली काही वर्षे हंगामाआधी जयसिंगपूर येथे ऊस परिषद घेऊन त्या ठिकाणी शेट्टी ऊस दराच्या मागणीचा आकडा जाहीर करतात, मात्र त्यांनी या वेळी आकडा सांगण्यापेक्षा एफआरपीप्रमाणे दर देण्याची मागणी केली.

या वेळी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांचीही भाषणे झाली. या दोघांनीही साखर कारखानदारांच्या कारभारावर चौफेर टीका केली. सांगली, सोलापूर, बीड, उस्मानाबादसह राज्यातील असंख्य शेतकऱ्यांनीही या परिषदेला हजेरी लावली होती.

तोच उत्साह
यंदाच्याही ऊस परिषदेत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा तोच उत्साह दिसून आला. हलगी, घुमक्याच्या नादात अनेकांनी या मैदानावर प्रवेश केला. चाबकाच्या फटकाऱ्यांचे आवाज काढत आणि शेट्टी यांच्या विजयाच्या घोषणा देत शेतकऱ्यांनी मैदान दणाणून सोडले.