आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajya Sabha Deputy Chairman Kurian Angry At Chiranjeevi

शांत बसा, अन्यथा चालते व्हा : आंध्रातील मंत्र्यांवर कुरियन भडकले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तुम्ही लोकसभेचे सदस्य आहात, नीट वागा, नाही तर चालते व्हा, अशा कठोर शब्दांत राज्यसभेचे उपाध्यक्ष पी. जे. कुरियन यांनी तेलंगणच्या मुद्द्यावर राज्यसभेच्या कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न करणार्‍या दोन मंत्र्यांना तंबी दिली. तेलंगणच्या मुद्द्यावर के. चिरंजीवी आणि के. एस. राव हे दोन केंद्रीय मंत्री राज्यसभेच्या कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा कुरियन यांनी ही तंबी दिली.
दोन्ही काँग्रेस मंत्री हे लोकसभेचे सदस्य आहेत. त्यामुळे निषेध व्यक्त करून ते वरच्या सभागृहाच्या (राज्यसभा) कामकाजात अडथळे आणून ते विस्कळीत करू शकत नाहीत, हा नियम विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी लक्षात आणून दिला. जेटली यांच्या या निवेदनाची दखल
घेत कुरियन यांनी दोन्ही मंत्र्यांना जागेवर बसा, अन्यथा सभागृह सोडून चालते व्हा, अशी ताकीद दिली. गोंधळामध्ये उपाध्यक्ष कुरियन सभागृहाचे कामकाज पुढे रेटत असताना आधी सभागृह सुरळीत करावे आणि मगच पुढील कामकाज हाती घ्यावे, असा आग्रह भाजपचे व्यंकय्या नायडू आणि इतर सदस्यांनी धरला. सपचे नरेश अग्रवाल यांनी तेलंगण विधेयक सभागृहात सादर करण्याच्या सरकारच्या पद्धतीवरही आक्षेप घेतला. पुरवणी कामकाज पत्रिकेत विधेयकाचा उल्लेख आाहे; पण त्याची सूचना नाही, असे अग्रवाल म्हणाले. पूर्वसूचना न देता विधेयक सादर करण्याची परवानगी देणे हा अध्यक्षांचा अधिकार आहे, असे कुरियन यांनी ठणकावले.
नियम काय?
राज्यसभेच्या नियमाप्रमाणे लोकसभेचे सदस्य असलेल्या मंत्र्यांना चर्चेत सहभागी होण्याची, सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याची परवानगी आहे; पण ते गोंधळ घालून अडथळे निर्माण करू शकत नाहीत. हा नियम विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी लक्षात आणून दिला.