आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय संघर्ष: राज्यसभा निवडणूक रद्द करा; काँग्रेसची आयोगाकडे मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार पराभूत करण्यासाठी भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कटकारस्थान रचल्याचा आरोप करत काँग्रेसने हरियाणातील दोन्ही जागांसाठीची निवडणूक रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस बी.के. हरिप्रसाद यांच्या नेतृत्वाखाली हरियाणा प्रदेशाध्यक्ष अशोक तनवार आणि विधी शाखेचे सचिव के.सी. मित्तल यांचा शिष्टमंडळात समावेश होता. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आर.के. आनंद यांना पराभूत करण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांनी केला.

आयएनएलडीने आनंद यांना पाठिंबा दिला होता. पक्षाची १४ मते अवैध ठरवण्यास काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री बी.एस. हुडा आणि भाजप जबाबदार असल्याचा आरोप या पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. यामुळे भाजपच्या पाठबळावर अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा विजयी झाले. चंद्रा यांनी लोकशाही आणि राज्यघटनेची फसवणूक केल्याचा आरोप आनंद आणि काँग्रेस नेत्यांनी केला आहे. निवडणूक प्रक्रिया "हायजॅक' करण्यासाठी कट रचण्यात आला. या प्रकरणी सुभाष चंद्रा, अपक्ष आमदार जयप्रकाश यांच्या भूमिकेबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ही तक्रार दाखल करेल. आयोगाने आमचे म्हणणे ऐकले. निवडणूक निकाल निरंक ठेवत नव्याने निवडणूक घेण्याची आम्ही मागणी केली असल्याचे आनंद यांनी सांगितले.

पक्षाच्या निर्देशानुसार सर्व आमदारांनी मतदान केले. मतदान प्रक्रियेत पक्षाचा निरीक्षक म्हणून सर्व आमदारांनी मतदान केल्याचे पाहिले. कोणीही बंड केले नव्हते. आनंद यांना पराभूत करण्यासाठी भाजप-संघाने मोठे कारस्थान केले, असे हरिप्रसाद यांनी सांगितले. हुडा यांनी मतदान केले नव्हते या प्रश्नावर त्यांनी तुम्हाला कोणी सांगितले, असा उलट प्रश्न करत हुडा यांनी मतदान केल्याचा दावा केला. मतदान प्रक्रियेतील पेनाच्या वादाबाबत ते म्हणाले, १४ काँग्रेस आमदारांची मते अपात्र व्हावीत यासाठी भाजप आमदार असीम गोयल यांनी पेन बंद केला. जयप्रकाश यांनी तेथील मूळ पेन तेथून नेल्याचा आरोप केला. हा मुद्दा आयोगासमोर का उपस्थित केला नाही, या प्रश्नावर मतदानावेळी हे लक्षात येत नाही. मतदानाचा पॅटर्न कळल्यानंतर त्याची जाणीव झाली, असा दावा आनंद यांनी केला.

सपचे चार आमदार निलंबित
लखनौ- पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून समाजवादी पक्षाच्या चार आमदारांना निलंबित करण्यात आले. नवाझिश अालम(बुधना-मुजफ्फरनगर) भगवान शर्मा(दिबाई), मुकेश शर्मा(शिक्रापूर-बुलंदशहर) आणि श्याम प्रकाश(गोपमाऊ-हरदोई) अशी त्यांची नावे आहेत. पक्षादेशाची अवहेलना करणे आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याविरोधात काम केल्याचा त्यांच्यावर आरोप असल्याचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी सांगितले.