आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा: मंत्री करा, नाही तर भीमटोला; आठवलेंकडून दबावतंत्राचा वापर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मंत्रिपद आता मिळाले नाही तर कधीच मिळणार नाही, असे म्हणत महायुतीचा घटक असलेले रिपाइं नेते रामदास आठवले मंत्रिपदासाठी दिल्लीत तळ ठोकून आहेत. त्यांनी दिल्लीतील भाजपच्या सर्व दिग्गज नेत्यांच्या भेटी घेतल्या. मंत्रिपद न मिळाल्यास येत्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीला भीमशक्ती दाखविण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे संकेत त्यांनी ‘दिव्य मराठी’ सोबत बोलताना दिले आहेत.

राज्यातील खासदार आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीने गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्र सदन गजबजून गेले होते. मात्र, कालपासून येथे शुकशुकाट आहे. मंत्रिपदाची अपेक्षा बाळगून असलेले भाजपचे खासदार माघारी फिरलेत. शिवसेनेच्या खासदारांनीही दिल्ली सोडली. राज्यातील सर्व खासदार शपथविधीच्यावेळी पुन्हा गर्दी करतील, परंतु रामदास आठवले दिल्लीच तळ ठोकून आहेत. नरेंद्र मोदी यांची भेट होऊ शकली नसली तरी फोनवर त्यांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे त्यांना त्यांचे मंत्रिपद पक्के झाल्याची खात्री वाटते. लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, सुषमा स्वराज या नेत्यांच्या त्यांनी घेतलेल्या भेटी आणि ‘तुम्ही मंत्रिपदाचे दावेदार असू शकता’ असे या नेत्यांकडून प्रत्युत्तर मिळाल्याने आठवलेंना आता कॅबिनेटचे वेध लागले आहेत. ते म्हणाले, मला कॅबिनेट मंत्रिपद मिळाले तरच तळागाळातील लोकांचा विकास करू शकेन. राज्यमंत्री पदाला काही अर्थ नसतो. कमीत कमी मी स्वतंत्र कार्य मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारेन.

आघाडीला संपवण्यासाठी भीमशक्ती हवीच
आठवले म्हणाले, लवकरच राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यात आघाडी सरकारला समूळ संपवायचे असल्यास भीमशक्तीशिवाय पर्याय नाही. याचा विचार करून मोदी मला मंत्रिपद देतील. शिवसेनेने मात्र, त्यांच्या कोट्यातून आठवलेंना मंत्रिपद देण्यास स्पष्ट नकार दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यातून भाजपला चार ते पाच मंत्रिपदे मिळतील त्यातही भाजपच्याच वरिष्ठ खासदारांची लांबलचक यादी आहे. अशावेळी आठवलेंना जेवढे दिले तेवढे खूप आहे असे सांगून हा विषय भाजप आणि शिवसेनेला थांबवावा लागणार आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.