आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramkrishna Yadav News In Marathi, Lalu Prasad Yadav

लालूंचा राम भाजपच्या गळाला; मुलीच्या प्रेमापोटी भक्ताला गमावले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- राष्ट्रीय जनता दलाचे बंडखोर नेते रामकृपाल यादव यांनी मंगळवारी येथील विमानतळावर भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह आणि भाजप नेते रविशंकर यांची भेट घेतली. उद्या बुधवारी ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

रामकृपाल यांची बिहारच्या पाटलीपुत्र मतदारसंघात राजदकडून निवडणूक लढवण्याची इच्छा होती. मात्र, राजदप्रमुख लालूप्रसाद यादव यांची कन्या मिसा भारती यांनी त्यावर दावा सांगितल्याने रामकृपाल यांनी पक्षातून बाहेर पडणे पसंत केले आहे. योग गुरू रामदेवबाबा त्यांच्या एका सहकार्‍यासाठी पाटीलपुत्र मतदारसंघ मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे रामकृपाल यांना भाजप प्रवेश दिला, तरी त्यांना भाजपची उमेदवारी मिळते काय, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. रामकृपाल यादव या संपूर्ण प्रकरणावर बुधवारी मतप्रदर्शन करणार आहेत. मी आज राजनाथ सिंह यांची भेट घेतली. चर्चा चांगली झाली, असे यादव म्हणाले.

लालूप्रसादांनी रामकृपाल यांना पाटलीपुत्रची उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी राजदच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. मिसा भारती त्यांचे मन वळवण्यासाठी गेल्यानंतरही रामकृपाल यांनी आपला दावा सोडला नाही. रामकृपाल यांना भाजपच्या वाटेवर आणण्यात लोकजनशक्ती पार्टीचे प्रमुख रामविलास पासवान यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे मानले जाते.

पंतप्रधानपदाची लालूच..
पाटणा- लालची लोक खासदार, पंतप्रधानपदासाठी झगडत आहेत, मी मात्र जातीयवादी शक्तींशी लढत असल्याची प्रतिक्रिया राजदप्रमुख लालूप्रसाद यादव यांनी दिली आहे. रामकृपाल यांच्या भाजपमधील संभाव्य प्रवेशाबाबत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. लालू यांनी या वेळी कोणाचाही नामोल्लेख केला नाही. मात्र, त्यांच्या बोलण्याचा रोख रामकृपाल यादव, गुलाम गौस आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या दिशेने होता. असे असले तरी आपले आशीर्वाद रामकृपाल आणि त्यांच्या कुटुंबीयांना असतील, हे सांगण्यास लालू विसरले नाहीत.