आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंध्र प्रदेश, तेलंगणात उबरच्या कॅबवर बंदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद/ नवी दिल्ली - दिल्लीतील कॅब बलात्कार प्रकरणातील आरोपी चालकाचा आयफोन मथुरेतून जप्त करण्यात आला आहे. या फोनमधून अनेक महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. उबर कॅब कंपनीच्या अडचणी वाढत आहेत. बुधवारी आंध्र प्रदेश, तेलंगण व महाराष्ट्रात या कंपनीवर बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकन कॅब कंपनी उबर आपल्या कर्मचाऱ्यांना सर्व अॅप्स व आयफोन देते. याद्वारेच ऑनलाइन बुकिंग केली जाते. मात्र, आरोपी शिवकुमार यादव याने बलात्कारानंतर आपला मोबाइल दडवला होता. दिल्ली पोलिसांनी या फोनची शोधाशोध केली. मथुरेतून हा फोन पोलिसांनी जप्त केला. त्याचे दोन फोन पोलिसांनी आधीच जप्त केले.
आयफोन आमच्यासाठी मुख्य पुरावा असून यामुळेच शिवकुमार उबरसाठी काम करतो हे सिद्ध करता येईल. शिवकुमारच कॅब चालवत होता हेदेखिल सिद्ध करता येईल. पीडित महिलेने जेथून कॅब घेतली होती त्याचे जीपीएस संकेत पोलिसांना मार्ग शोधण्यास मदत करू शकतील. घटनास्थळी कॅब केव्हा पोहोचली व महिलेला त्याने कधी घरी सोडले, या वेळाही यावरून निश्चित करता येतील. ग्राहकाला योग्य ठिकाणी ड्राॅप केल्याचा संदेश शिवकुमारने कंपनीच्या प्रणालीवर पाठवला होता.

कॅलिफोर्निया, व्हिएतनाममधील स्थिती बिकट
अमेरिकेत कॅलिफोर्नियाच्या वकिलाने कंपनीला नोटीस बजावली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप उबरवर करण्यात आला आहे. व्हिएतनामी सरकारशीही कंपनीची बोलणी अपूर्णच राहिली आहेत. येथील परिवहन विभागाने उबरच्या सेवेला अवैध ठरवले आहे.
लोकसभेत पुन्हा वाद : काँग्रेस सदस्या सुश्मिता देब यांनी लोकसभेत हा मुद्दा उचलून धरला. प्रतिबंध असूनही उबर टॅक्सी आढळून आल्याचे त्या म्हणाल्या. दिल्ली महिला आयोगाने उबरच्या स्थानिक प्रमुखाला समन्स पाठवले.
हायकाेर्टात याचिका मंजूर : दिल्ली उच्च न्यायालयात रेडिआे कॅबशी संबंधित याचिका स्वीकारली आहे. या कॅबसाठी नियमावली निश्चित करण्याची मागणी यात करण्यात आली आहे. केंद्राने काय कारवाई केली आहे, असा प्रश्न न्यायालयाने विचारला. ४ फेब्रुवारी रोजी याची सुनावणी होणार आहे.