नवी दिल्ली - 1971 च्या युद्धात पाकिस्तानला मानहानिकारक मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. पूर्व पाकिस्तान स्वतंत्र होऊन एक नवा देश 'बांगलादेश' निर्माण झाला. हे युद्ध भारताच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि देशवासियांच्या मनात आनंद आणि ऊर्जा निर्माण करणारे ठरले. देशभरात 16 डिसेंबर 'विजय दिवस' म्हणून साजरा झाला होता. युद्धाच्या अखेरच्या दिवशी ढाकामध्ये पाकिस्तानी फौजेचे अधिकारी नियाजी यांनी भारतीय सैन्याचे अधिकारी अरोरा यांच्यासमोर 93000 सैनिकांसह आसवं ढाळत, रडत-रडत आत्मसमर्पण केले होते. युद्धात भारताचे जवळपास 3900 भारतीय सैनिक शहीद झाले होते, तर 9851 जखमी झाले होते.
> पूर्व पाकिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याचे कमांडर लेफ्टिनेंट जनरल ए.ए.के. नियाजी यांनी भारतीय सैन्याचे तत्कालिन कमांडर लेफ्टिनेंट जनरल जगतसिंग अरोरा यांच्यासमोर आत्मसमर्पण केले होते. 17 डिसेंबर रोजी 93000 पाकिस्तानी सैनिकांना युद्धबंदी करण्यात आले होते.
> 3 डिसेंबर 1971 रोजी इंदिरा गांधी तत्कालिन कलकत्त्यात एका सभेला संबोधित करत होत्या. त्याच दिवशी पाकिस्तानी वायुदलाच्या विमानांनी भारतीय हवाई हद्दीत घुसून पठाणकोट, श्रीनगर, अमृतसर, जोधपूर, आग्रा येथे लष्करी हवाई तळावर बॉम्ब वर्षाव सुरु केला होता. त्याचवेळी इंदिरा गांधी तातडीने दिल्लीला परतल्या आणि मंत्रिमंडळाची आपातकालिन बैठक बोलावली.
> 14 डिसेंबर रोजी भारतीय लष्कराला एका गुप्त संदेशाच्या माध्यमातून समजले की सकाळी 11 वाजता ढाकाच्या गव्हर्नर हाऊसमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे, यात पाकिस्तान प्रशासनाचे बडे अधिकारी सहभागी होणार आहेत. भारतीय सैन्याने त्याच वेळी ठरविले की बैठकीच्या वेळीच त्या भवनावर बॉम्ब हल्ला करायचा. बैठकीच्यावेळी मिग 21 विमानांनी बॉम्ब वर्षाव करुन गव्हर्नर हाऊसचे छत उडवले. गव्हर्नर मलिक यांनी थरथरत्या हाताने स्वतःचा राजीनामा लिहिला.
> 16 डिसेंबरच्या सकाळी जनरल जॅकब यांना मानेकशॉ यांचा संदेश मिळाला की आत्मसमर्पणासाठी तातडीने ढाक्याला पोहोचा. संदेश मिळताच जॅकब अस्वस्थ झाले. नियाजीकडे ढाकामध्ये 26400 सैनिक होते, तर भारताकडे 3000 सैनिक आणि ते दखील ढाकापासून 30 किलोमीटर अंतरावर.
> सायंकाळी साडेचार वाजता जनरल अरोरा हेलिकॉप्टरने ढाका विमानतळावर उतरले. अरोरा आणि नियाजी एका टेबलसमोर आमने-सामने बसले. दोघांनी आत्मसमर्पणाच्या दस्तऐवजावर स्वाक्षरी केली. नियाजींनी स्वतःची पदके उतरवली आणि रिव्हाल्वर जनरल अरोरा यांच्याकडे सुपूर्द केली.
> इंदिरा गांधी संसद भवनातील आपल्या कार्यालयात टीव्हीला मुलाखत देत होत्या. तेव्हाच मानेकशॉ तिथे दाखल झाले आणि त्यांनी इंदिराजींना बांगलादेशात मिळालेल्या शानदार विजयाची बातमी दिली. इंदिरा गांधींनी लोकसभेत घोषणा केली की युद्धात भारताला विजय मिळाला आहे. इंदिरा गांधींच्या घोषणेनंतर संपूर्ण सभागृह आनंदीत झाले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, नियाजींच्या आत्मसमर्पणाचे ऐतिहासिक फोटोज्...