आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ravi Shastri To Be Highest Paid Coach Get 7 Cr Annually

रवी शास्त्रीच पूर्णकालीन कोच ? अतिरिक्त अधिकारही मिळणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो : रवी शास्त्री आणि विराट कोहली. - Divya Marathi
फाईल फोटो : रवी शास्त्री आणि विराट कोहली.
नवी दिल्ली - टीमइंडियाचे संचालक रवी शास्त्रीच पूर्णकालीन कोच बनण्याची शक्यता आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने बीसीसीआय सूत्रांच्या माहितीने हा दावा केला आहे. वृत्तानुसार कोच म्हणून शास्त्री यांना वर्षाला सात कोटी रुपयांचे वेतन मिळू शकते. असे झाले तर शास्त्री जगात सर्वाधिक वेतन मिळवणारे क्रिकेट कोच ठरतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बांगलादेश दौऱ्याच्या अखेरीस शास्त्री यांच्या नावाची प्रशिक्षक पदावर अधिकृत घोषणा होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कसोटी कर्णधार विराट कोहलीने शास्त्री यांच्यासाठी जोरदार बॅटिंग केल्याचे बोलले जाते. प्रशिक्षक म्हणून ड्रेसिंग रूममध्ये शास्त्री हवे आहेत, असे कोहलीने म्हटल्यानंतर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी नव्या कोचची शोधमोहीम बंद केल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.

पॅकेजवर अद्याप निर्णय नाही
बांगलादेशदौऱ्यानंतर रवी शास्त्री यांचे पॅकेज अर्थात वेतनाबाबत चर्चा होईल, असे सूत्रांनी सांगितले. प्रशिक्षक झाल्यानंतर त्यांना समालोचक आणि इतर मीडियासोबत झालेल्या करारावर पाणी सोडावे लागेल. शास्त्री यांची कोच म्हणून नियुक्ती झाली तर २००० नंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक बनणारे ते पहिले भारतीय ठरतील. रवी शास्त्री यांनी एकवेळा बीसीसीआयसोबत टीव्ही समालोचक म्हणून वर्षाला कोटींचा करार केला आहे. वर्ल्डकपपर्यंत त्यांना टीम डायरेक्टर म्हणून वर्षाला जवळपास कोटी रुपये मिळत होते. यापूर्वी टीम इंडियाचे कोच झिम्बाब्वेचे डंकन फ्लेचर होते. फ्लेचर यांचे वार्षिक वेतन ४.२ कोटी रुपये इतके होते.

एका इंग्रजी वर्तमानपत्राचा दावा
गत २००० मध्ये न्यूझीलंडचे माजी खेळाडू जॉन राइट प्रशिक्षक झाले होते. ते भारताचे पहिले विदेशी कोच ठरले. यानंतर टीम इंडियाची जबाबदारी विदेशी प्रशिक्षकाच्या हातीच होती. जॉन राइट, ग्रेग चॅपेल, गॅरी कर्स्टन आणि डंकन फ्लेचर या दिग्गजांनी टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली. चॅपेल गेल्यानंतर काही काळ रवी शास्त्री यांच्या हाती टीम इंडियाची तात्पुरती धुरा होती. मात्र, ते पूर्णकालीन कोच नव्हते.

आता फ्लेचर यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मुख्य प्रशिक्षकपदाची खुर्ची रिकामी आहे. वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या शानदार प्रदर्शनाचे श्रेय शास्त्री यांना दिले जाते. संघातील सर्व खेळाडू शास्त्री यांच्यावर भरवसा करतात, असे मानले जाते. यामुळेच भारतीय क्रिकेट नियामक मंंडळ हे टीम डायरेक्टर आणि प्रशिक्षख या दोन्ही पदांना एक करण्याचा विचार करीत आहे. यामुळे रवी शास्त्री यांची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती शक्य आहे. इतकेच नव्हे तर शास्त्री यांना संपूर्ण स्वातंत्र्य असेल. त्यांच्याकडे अतिरिक्त अधिकारही असतील. संघ निवडीतही त्यांना अधिकार मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे टीमचा चांगल्या प्रकारे विकास साधला जाईल.

शास्त्री श्रीनि गटाचे
रवीशास्त्री यांना माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या गटाचे मानले जाते. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण समोर आल्यानंतर शास्त्री यांनी श्रीनिवासन यांच्याबाबत बोलताना, ते चांगले प्रशासक आहेत. क्रिकेटमध्ये त्यांचे योगदान मोठे आहे, असे म्हटले होते.

१५ वर्षांनंतर फुलटाइम कोच
अखेरीस१९९९-२००० या काळात माजी कर्णधार कपिलदेव टीम इंडियाचे काेच होते. त्यानंतर जॉन राइट, चॅपेल, कर्स्टन, फ्लेचर कोच झाले. आता शास्त्री कोच झाले तर १५ वर्षांनंतर टीम इंडियाला फुलटाइम भारतीय प्रशिक्षक मिळेल.

शास्त्री कोच झाल्यास हे फायदे
}भारतीय असल्यामुळे नव्या खेळाडूंना त्यांच्याशी संवाद साधताना भाषेची अडचण येणार नाही. कर्स्टन, फ्लेचर यांच्या काळात अनेक खेळाडूंना भाषेची अडचण येत होती.
} खेळाडू आपले म्हणणे सहजपणे बोलू शकतील. शिवाय कोच काय म्हणत आहेत, हेसुद्धा त्यांना सहजपणे कळेल.
} शास्त्री यांचे क्रिकेटचे ज्ञान, बारकावे आणि तंत्राची माहिती उत्तम आहे. याचा खेळाडूंना थेट फायदा होईल.
} खेळाडूंना एकसंघ ठेवण्यात रवी शास्त्री यांची हातोटी आहे. याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर सकारात्मक होतो.
} खेळाडूंच्या चुका शोधून त्या दुरुस्त करण्यात शास्त्री तरबेज. फॉर्म हरवलेल्या, आत्मविश्वास गमावलेल्या खेळाडूला चांगल्या प्रदर्शनासाठी प्रेरित करण्यात शास्त्री यांची मदत होऊ शकते. वर्ल्डकपमध्ये असेच झाले. वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियातील सर्व सामने गमावले होते. भारतीय संघाचा फॉर्म हरवलेला होता. मात्र, खेळाडूंना प्रेरित करून वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी करण्यात शास्त्री यांचे योगदान असल्याचे बोलले जाते.