आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटबंदीत पाचशे-हजाराच्या जुन्या 99 टक्के नोटा बँकांत आल्या परत: आरबीआयचा अहवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिझर्व्ह बँकेने नोटबंदीच्या काळात किती नोटा बँकेत आल्या याची महिती दिली. - Divya Marathi
रिझर्व्ह बँकेने नोटबंदीच्या काळात किती नोटा बँकेत आल्या याची महिती दिली.
मुंबई- काळ्या पैशाला लगाम घालण्याचा नोटबंदीमागचा उद्देश सपशेल फसल्याचे चित्र सध्या आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये १००० आणि ५०० रुपयांच्या ज्या नोटांवर बंदी घालण्यात आली त्यातील ९९ टक्के नोटा पुन्हा बँकिंग सिस्टिममध्ये परत आल्या आहेत. आता केवळ १ % नोटा बाहेर राहिल्या असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) २०१६-१७च्या वार्षिक अहवालात हे नमूद केले आहे. नोटबंदीपूर्वी १००० आणि ५०० च्या नोटांच्या स्वरूपात १५.४४ लाख कोटी रुपये चलनात होते. ३० जून २०१७ पर्यंत १५.२८ लाख कोटी इतक्या जुन्या नोटा चलनातून परत आल्या होत्या. केवळ १६,०५० कोटी रुपयांच्या नोटा बाहेर राहिल्याचे अहवालात नमूद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१७ रोजी या नोटबंदीची घोषणा केली होती. आरबीआयने हे आकडे जाहीर केल्यानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. या नोटबंदीच्या उद्देशांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून काळा पैसा कुठे आहे, अशी विचारणा विरोधी पक्षांनी केली आहे. दरम्यान, यानंतर एका पत्रकार परिषदेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सविस्तर भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘ज्या लोकांना काळ्या पैशाबाबत सखोल माहिती नाही तेच याचा संबंध नोटबंदीनंतर परत बँकांमध्ये जमा झालेल्या नोटांशी जोडत आहेत.’

१०००च्या १.३ % नोटा बँकेत परत आल्या नाहीत
नोटबंदीपूर्वी १००० रुपयांच्या ६८५.८ कोटी आणि ५०० रुपयांच्या १,७१६.५ कोटी नोटा चलनात होत्या. १००० रुपयांच्या ८.९ कोटी म्हणजे १.३ % नोटा परत बँकेत आल्या नाहीत. बँकेने ५०० रुपयांच्या नोटांबाबत काहीही सांगितलेले नाही.

नोटांच्या छपाईवर या वर्षी दुपटीहून अधिक खर्च
आरबीआयने नव्या नोटांच्या छपाईवरील खर्चाचा ताळेबंदही जाहीर केला. २०१६-१७मध्ये २०००, ५०० आणि इतर नोटांच्या छपाईवर ७,९६५ काेटी रुपये खर्च झाला. एक वर्षापूर्वी नोटांच्या छपाईवरील खर्च ३,४२१ कोटी रुपये होता. या वर्षात बँकेचे उत्पन्न २३.५६ टक्के घटल्याचे नमूद करून खर्च १०७.८४ टक्क्यांनी वाढल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

अशा अर्थतज्ज्ञाला तर नोबेल पुरस्कार द्यायला हवा : माजी अर्थमंत्री चिदंबरम
माजी अर्थमंत्री व काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ‘नोटबंदीमुळे रिझर्व्ह बँकेचे १६,००० कोटी रुपये वाचले, मात्र नोटांच्या छपाईवर २१,००० कोटी खर्च झाले. अशा अर्थतज्ज्ञास नोबेल पुरस्कार मिळायला हवा. नोटबंदीची शिफारस करणाऱ्या रिझर्व्ह बँकेला लाज वाटली पाहिजे.’ सपा नेते नरेश अग्रवाल यांनी आरबीआय गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्याविरुद्ध संसदेत प्रस्ताव आणणार असल्याचे म्हटले आहे.

केवळ ७.१ टक्के नोटा नकली निघाल्याचा आरबीआयचा सर्व्हेच्या आधारे दावा
केंद्राने काळा पैसा व भ्रष्टाचाराला लगाम तसेच नकली नोटा चलनातून बाद व्हाव्यात म्हणून नोटबंदी लागू केल्याचे म्हटले होते. मात्र, रिझर्व्ह बँकेने सँपल सर्व्हेच्या आधारे स्पष्ट केले आहे की, ५०० रुपयांच्या १० लाख नोटांमध्ये केवळ ७.१ टक्के नोटा नकली निघाल्या. १०००च्या १० लाख नोटांत १९.१ टक्के नकली होत्या. या संपूर्ण वर्षात ७.६२ लाख नकली नोटा पकडण्यात आल्या होत्या. यापूर्वीच्या वर्षी ही संख्या ६.३२ लाख होती
 
बातम्या आणखी आहेत...