आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi For Innovation In Renewable Energy For Affordable Power

अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रावर भर देण्याचे पंतप्रधानांचे उद्योजकांना आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सौर, वायू या अपारंपरिक क्षेत्रात पुरेशा प्रमाणात संशोधनाची गरज आहे. अशा संशोधनातूनच सामान्यांना वाजवी दरात विजेची उपलब्धता शक्य होईल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीव्यक्त केले.
एनटीपीस, सुझलॉन, रिलायन्स पॉवर यासारख्या कंपन्यांनी अपारंपरिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. सौरऊर्जा क्षेत्रातील संशोधनासाठी ५० देश एकत्रपणे एका संघाची स्थापना करणार आहेत. त्यात सौर किरणोत्सर्ग, तंत्रज्ञान, त्याची गरिबांपर्यंतची पोहोच, दुर्गम भागापर्यंत पोहोचवण्यासाठी तंत्रज्ञानात सुधारणा इत्यादी पातळीवर ५० देश मिळून काम करतील. अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील जागतिक गुंतवणूकदारांच्या परिषदेत (आरई-इन्व्हेस्ट) पंतप्रधान रविवारी मार्गदर्शन करताना बोलत होते. ही परिषद तीन दिवस चालणार आहे.
भारत ऊर्जा क्षेत्राकडे अतिशय सजगपणे पाहतो. त्यानुसार औष्णिक, वायु, जलविद्युत, आण्विक ऊर्जेच्या क्षेत्राबरोबरच देशाने आता आपले लक्ष सौरऊर्जा, वायू तसेच बायोगॅसकडे केंद्रित करण्याचे ठरवले आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले. सोलर फोटो व्होल्टिक सेल युनिटमधून मिळणारी वीज २० रुपयांवरून ७ रुपयांवर आणण्यात यश आले आहे.
संशोधनातूनच हे शक्य झाले आहे. ही किंमत आणखी कमी होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. तळागाळातील कुटुंबापर्यंत वीज पोहोचत नाही तोपर्यंत विकासाची गंगा पोहोचली असे म्हणता येणार नाही. म्हणून जागतिकीकरणाच्या युगात ऊर्जानिर्मितीच्या क्षेत्रात मोठी झेप आणि उपलब्धता असणे काळाची गरज आहे.
पाच वर्षांत २६६ गीगावॅट
देशात २६६ जीडब्ल्यू एवढी वीजनिर्मिती करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीसाठी देशातील २९३ कंपन्यांनी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली आहे. पाच वर्षांत हे प्रकल्प उभारण्यात येतील. एसबीआय १५ हजार मेगावॅट वीजनिर्मितीसाठी अर्थपुरवठा करेल.
प्रकल्पासाठी पुढाकार घेणाऱ्या कंपन्या

सुझलॉन-वेलस्पून-११,००० मेगावॅट, एनटीपीसी-हिंदुस्तान पॉवर-१०,००० मेगावॅट, रिन्यू पॉवर ११,५०० मेगावॅट, सन एडिसन-१५००० मेगावॅट, गॅमेसा-७५०० मेगावॅट, अनिल अंबानीप्रणीत रिलायन्स पॉवर-६००० मेगावॅट.
हायब्रीड एनर्जी पार्क

सूर्यकिरणांची वर्षातील अनेक दिवस उपलब्धता असलेल्या भागात हायब्रीड एनर्जी पार्कची निर्मिती केली जाऊ शकते. त्यातून वीज पारेषण आणि पायाभूत सुविधांवरील खर्चाची बचत केली जाऊ शकते. अशा प्रकारचे पार्क अनेक ठिकाणी उभारले जाऊ शकतात, असे मोदी यांनी सुचवले.
सात घोड्यांचा रथ

२००७ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी विजेबाबतचे राज्य सरकारचे धोरण सांगताना त्याचे वर्णन रथाशी केले होते. वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जेवर भर देण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यानुसार सात घोडे असलेल्या रथावर जनता स्वार होईल, असे म्हटले होते. अर्थात, विजेचा कोणताही तुटवडा जाणवणार नाही व वीज वाजवी दरात उपलब्ध होईल, असे त्यांनी म्हटले होते.
फोटो - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार स्वीकारताना पंजाबचे ऊर्जा मंत्री बिक्रम सिंग मजेठिया.