आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reservation Is Needed Till Inequality Is In Society: Mohan Bhagwt

समाजातील विषमतेच्या अंतापर्यंत आरक्षण गरजेचे : संघ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - समाजातील विषमतेवर चिंता व्यक्त करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जाहीररीत्या आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. समाजातील विषमता दूर होईपर्यंत भेदभावाने गांजलेल्या वर्गाला आरक्षण आवश्यकच आहे, मात्र कोटा पद्धतीच्या मुद्यावर राजकारण होता कामा नये, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी व्यक्त केले.

भागवत म्हणाले की, आमचा आरक्षणाला पाठिंबा आहे. जोवर समाजात विषमता आहे तोवर आरक्षण गरजेचेच आहे. विषमतेला बळी पडलेला उपेक्षित वर्ग समतेच्या पातळीवर येईपर्यंत आरक्षण हवे. मात्र त्यावरून कोणतेही राजकारण केले जाऊ नये.

दिल्लीत सरसंघचालक भागवत, केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी, विहिंपचे अशोक सिंघल, माहिती व प्रसारणमंत्री मंत्री प्रकाश जावडेकर, गायत्री परिवाराचे प्रमुख डॉ. प्रणव पंड्या यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय अनुसूचित जाती - जमाती आयोगाचे अध्यक्ष विजय सोनकर यांच्या ‘हिंदू वाल्मीकी जाती, हिंदू खाटीक जाती आणि हिंदू चर्मकार जाती’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी त्यांनी ही भूमिका मांडली.

सर्वांना समतेच्या पातळीवर आणायचे असेल तर सामाजिकदृष्ट्या प्रगत वर्गांनी थोडे खाली वाकून वंचितांना मदतीचा हात द्यायला हवा, या जनसंघाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विधानाचा संदर्भही भागवत यांनी दिला. समाजातील सर्व वर्गांत सामाजिक सौहार्द व एकोप्याची गरज आहे. मात्र उच्चभ्रूमध्ये बोकाळलेल्या गर्वाच्या भावनेबद्दलही त्यांनी धोक्याचा इशारा दिला. दरम्यान, डॉ. प्रणव पंड्या यांनी जातीचे संकेत देणारी आडनावे काढून टाकली पाहिजेत याकडे लक्ष वेधले.

उपेक्षित, वंचितांना बरोबरीत आणणे हे आपले कर्तव्य
भागवत म्हणाले, समाजातील वंचित वर्गांनी देशाच्या हितासाठी एक हजार वर्षांपर्यंत अन्याय सहन केला. ज्या कारणांसाठी त्यांनी हा अन्याय सहन केला ती कारणे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अस्तित्वात राहिलेली नाहीत. आता या वंचितांना बरोबरीत आणावे, हे आपले परमकर्तव्य आहे. यासाठी आपल्याला १०० वर्षांपर्यंत अन्याय सहन करावा लागला तरी चालेल. या वर्गाला आरक्षण असायला हवे. मात्र त्यावरून कोणत्याही प्रकारे राजकारण केले जाऊ नये.

पुढारलेल्यांनी वंचितांना मदतीचा हात दिला पाहिजे
विकासाची अभिलाषा असलेला समाज अधिक काळापर्यंत अशी परिस्थिती सहन करू शकत नाही. समतेचे हे उद्दिष्ट स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साध्य व्हायला हवे होते. एकमेकांच्या सहकार्याने सर्वांगीण समतेचे उद्दिष्ट साध्य केले जाऊ शकते. सामाजिकदृष्ट्या पुढारलेला वर्ग जोपर्यंत मदतीचा हात देत नाही तोपर्यंत वंचितांचे उन्नयन अशक्य आहे, असे भागवत म्हणाले.

उच्च आणि तंत्रशिक्षण सर्वांना झेपणारे असावे
अलीकडे अनेक सुज्ञ लोक आरक्षणाच्या रकान्यास मूठमाती देत सामान्य गटातून स्पर्धा करतात. त्यांचा सन्मान व्हायला पाहिजे. मात्र, उच्च शिक्षणासाठी पैसे मोजावे लागत असतील तर मग आरक्षणाचा लाभ का घेऊ नये, असे त्यांच्या पालकांना वाटू लागेल. यामुळे त्यांना जातींच्या जोखडातून निघता येणार नाही. त्यामुळे खिशाला परवडणारे शिक्षण सर्वांना घेता यावे, यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावीत.

संघाच्या भूमिकेत बदलाचे संकेत
आजवर संघाने आरक्षणाला जाहीररीत्या पाठिंबा दिलेला नव्हता. या पार्श्वभूमीवर भागवत यांचे वक्तव्य संघाच्या भूमिकेतील बदलाचे संकेत मानले जात आहेत. विशेष म्हणजे २०१० मध्ये मोहन भागवत यांनी जात किंवा धर्माच्या आधारे आरक्षण दिले जाऊ नये, अशी भूमिका मांडली होती.

माजी सरसंघचालक के.एस. सुदर्शन यांनी २००६ मध्ये आरक्षणाला विरोध केला होता. आरक्षणाच्या आगीत अवघा देश भस्मसात होऊन जाईल. देशाला बराच काळ त्याची किंमत चुकवावी लागेल. आरक्षणामुळे देशातील प्रतिभावंत लोकांच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होईल, असे सुदर्शन यांचे मत होते.