आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपची सत्ता येताच वढेरांनी सुरू केले कंपन्या गुंडाळणे, 4 कंपन्यांना ठोकले ताळे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो रॉबर्ट वढेरा आणि प्रियंका गांधी

नवी दिल्ली - रियल इस्टेट उद्योगामध्ये शिखरे पादाक्रांत करण्याची इच्छा बाळगून हरियाणा आणि राजस्थानात 6 कंपन्या सुरू करणारे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वढेरा आता या कंपन्या एकापाठोपाठ एक बंद करत आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये सत्तापालट होऊन काँग्रेस सत्तेबाहेर गेली आहे.

हरियाणामध्ये डीएलएफबरोबरच्या जमीन व्यवहारामुळे वादात अडकलेल्या वढेरांच्या विरोधात चौकशी करण्याची घोषणा नव्या सरकारने केली होती. त्यानंतर नुकतेच वढेरा एका पत्रकाराबरोबर गैरवर्तन केल्यानेही वादात अडकले आहेत. इंग्रजी वृत्तपत्र डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार वढेरांनी बंद केलेल्या चार कंपन्यांमध्ये लाइफलाइन अॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड, ग्रीनवेव्ह अॅग्रो प्रायवेट लिमिटेड, राइटलाइन अॅग्रीकल्चर प्रायव्हेट लिमिटेड आणि प्राइम टाइम अॅग्रो प्राइवेट लिमिटेड यांचा समावेश आहे. त्या शिवाय फ्यूजर इन्फ्रा अॅग्रो आणि बेस्ट सीझन्स प्रायवेट लिमिटेड या कंपन्याही बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
या सर्व कंपन्या 2012 मध्ये सुरू करण्यात आल्या होत्या. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्सने दिलेल्या माहितीनुसार या सर्व कंपन्या कृषीसंबंधित किंवा जमीनीच्या व्यवहारांशी संबधित आहेत. वढेरा या सर्व कंपन्यांचे एमडी आहेत.

केंद्रात भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीए सरकार सत्तेत आले तेव्हापासूनच वढेरा यांनी या कंपन्या बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली होती, अशीही माहिती मिळाली आहे. या कंपन्यांचे काम यावर्षी मेपर्यंत सुरू होते असे मंत्रालयाचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे नरेंद्र मोदींनी 26 मे रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती.

जमीन विक्रीस सुरुवात
वढेरा यांनी कंपन्या बंद करण्याबरोबरच राजस्थान आणि हरियाणातील जमीन विकणेही सुरू केले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य आणि केंद्र सरकारच्या कडक भूमिकेमुळे त्यांनी हा निर्णय घेतला. वढेरा यांनी रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक सुरू केल्यानंतर त्यांच्या संपत्तीत वाढ होण्यास सुरुवात झाली होती. त्यांनी राजस्थान, हरियाणा, उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी केली होती. त्यातील बहुतांश व्यवहार हे वादग्रस्त होते. संशयास्पद व्यवहार आणि संपत्तीचा स्त्रोत ही त्याची कारणे होती.
उदाहरणार्थ राजस्थानमध्ये जमीन व्यवहारासाठी त्यांची कंपनी नॉर्थ इंडिया पार्क्स प्रायव्हेट लिमिटेड, रीयल अर्थ इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, स्काईलाइड रीयल्टी प्रायव्हेट लिमिटेड आणि स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड चौकशीच्या फे-यात आहे. या कंपन्यांद्वारे वढेरा यांनी हजारो एकर जमीन कवडीमोल भावात विकत घेतल्याचे आरोप आहेत. सरकारी रेकॉर्डमुसार या सर्व कंपन्या अजुनही सुरू आहेत.