आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 फुटांवरून निर्देश, रोबोट बनला सर्जन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अपोलो हॉस्पिटलच्या (दिल्ली) तिसर्‍या मजल्यावरील रोबोटिक सर्जरी ऑपरेशन थिएटर. दोन सर्जन आणि चार साहाय्यक. त्यांच्या हिरव्या गणवेशामुळेच ते रुग्णालय वाटते. अन्यथा मोठमोठी उपकरणे आणि एक्स्ट्रा लार्ज टीव्हीमुळे हे दृश्य एखाद्या कारखान्यासारखे दिसत आहे. डॉक्टरही रुग्णाजवळ नाहीत. थिएटरच्या एका कोपर्‍यात मोठ्या थ्री-डी स्क्रीनसमोर कन्सोलवर ते बसलेले आहेत. येथूनच ते एका रोबोटद्वारे ते पूर्ण ऑपरेशन करणार आहेत.
पाच वर्षांचा फजल डोळे फाडून खोलीकडे पाहत आहे. एका यंत्राला चार हात आहेत. त्यात सूक्ष्म सुयांसारखी उपकरणे आहेत. हाच रोबो-सर्जन आहे. फजल आश्चर्यचकित, मात्र भीतीचा लवलेशही नाही. नर्सने त्याला ऑपरेशन टेबलवर झोपवले आहे. भूलतज्ज्ञांनी कॅनुलातून त्याला इंजेक्शन दिले. पाच मिनिटांच्या आत तो गाढ झोपी गेला. त्याच्या तोंडात एक नळी टाकली गेली. त्यातून आता त्याला एका यंत्राद्वारे श्वास दिला जाईल. त्याला शस्त्रक्रियेची जाणीव होऊ नये आणि तो हलू नये म्हणून त्याच यंत्रातून त्याला सतत भुलीचे औषधही दिले जाईल. डॉ. चौधरी कन्सोलवर बसले आहेत. सहा फुटांवरून ते केवळ

बोटे हलवतील. दोन्ही हातांचे अंगठे आणि तर्जनीचा वापर करून रोबोटचे दोन्ही हात चालतील आणि पायाजवळ लावलेल्या दोन फूट पॅडलने रोबोटचा तिसरा व चौथा हात काम करील. अशा प्रकारे एकच सर्जन दोन माणसांचे काम करील. रोबोटचे हात माणसाच्या मनगटापेक्षा सातपट जास्त वळू शकतात. ज्या दिशांना आपले मनगट वळू शकत नाही त्या सर्व दिशांना रोबोटचे मनगट वळू शकते. डॉ. चौधरी यांनी आधी रोबोटच्या हातांची हालचाल फिरवून तपासली. नंतर फजलजवळ उभ्या असलेल्या डॉ. प्रसाद यांना सुरू करण्याचा इशारा केला. डॉ. चौधरी कन्सोलवरील माइकवरून बोलत होते आणि त्यांचा आवाज संपूर्ण खोलीत स्पष्ट ऐकू येत होता. डॉ. प्रसाद यांनी फजलच्या पोटावर सुमारे अर्ध्या इंचाचा छेद दिला. त्यातून रोबोटचा पातळ सळीसारखा हात फजलच्या पोटात टाकण्यात आला. यात कॅमेरा आणि लाइट बसवलेला आहे. डॉ. प्रसाद यांनी सांगितले की, साधारणपणे आम्हाला शरीराचे सात थर कापावे लागतात. मात्र रोबोट एका छोट्याशा छिद्रातून थेट शरीरात गेला. कॅमेर्‍यातून आम्हाला छोट्या जागेचे मोठे व उत्तम दृश्य दिसत आहे. त्यासाठी रोबोटशी जोडलेल्या अल्ट्रासाऊंडचा वापरही करण्यात आला.
नंतर डॉ. प्रसाद यांनी फजलच्या पोटावर आणखी तीन छेद दिले. त्यातून एकामागोमाग एक रोबोटचे तिन्ही हात आत टाकले गेले. एका हातात लहानशी कैची व दुसर्‍या हातात चिमटा आहे. डॉ. प्रसाद आता दोन पावले मागे सरकले आहेत. डॉ. चौधरी उजव्या हाताने रोबोटच्या आर्म वनमधील कैचीने फजलच्या पोटातील काही भाग अतिशय बारकाईने कापत आहेत. आर्म टू त्यांच्या डाव्या हाताने चालत असून त्यातील चिमट्याने त्यांनी स्नायू धरून ठेवले आहेत. डॉ. चौधरी आता रोगाच्या मुळापर्यंत पोहोचले आहेत. त्यांनी एका ज्युनिअर डॉक्टरला सक्शनसाठी तयार राहण्यास सांगितले. व्हॅक्युम सक्शन एका बारीक छिद्रातून पोटात टाकण्यात आला आणि फजलच्या मूत्राशयातून लघवी काढण्यात आली. बराच पूसुद्धा काढण्यात आला. मात्र रक्त किंचितच गेले. डॉॅ. चौधरी एकेक रक्तवाहिनी सांभाळत पुढे जात आहेत. दरम्यान फजल झोपेतून थोडासा जागा होत आहे. भुलीच्या औषधाचा डोस वाढवून दिल्यानंतर फजल पुन्हा गाढ झोपी गेला.
मुलाच्या मूत्राशयाचा आकार टेबल टेनिसच्या चेंडूपेक्षाही लहान असायला हवा. मात्र सध्या तो फुटबॉलएवढा आहे. डॉ. चौधरी मला मूत्राशय दाखवून माहिती देत होते. मी त्यांच्यापासून लांब, फजलच्या उशाला असलेल्या स्क्रीनवर सर्व दृश्ये पाहत आहे. मानवी शरीरात डोकावण्याची ही माझी पहिलीच वेळ. आता डॉ. चौधरी यांनी दुसरे ज्युनिअर डॉ. विनय यांना रोबोटिक टूल बदलण्यास सांगितले. दरम्यान डॉ. चौधरी यांनी मला आपल्या कन्सोलवर बसवले. तेथील थ्री-डी स्क्रीनवर ऑपरेशन होणारा भाग माझ्यासमोर असल्याचे मला भासले. जणू हात पुढे करून स्पर्श करायचाच बाकी आहे. शस्त्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. फक्त टाके घालायचे आहेत. डॉ. विनय यांनी कैची काढून एक हुकसारखी सुई रोबोटच्या आर्ममध्ये बसवली. आता टाके घालणे सुरू झाले. एकेक करून सर्वात आधी आतला थर शिवला गेला. यास रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी म्हणतात. डॉ. चौधरी यांनी समजावून सांगितले की, मी मुलाच्या मूत्राशयाचा आकार लहान करत आहे. आणखी एक नवी नळी तयार करून ती किडनी व मूत्राशयाला जोडत आहे. जर रोबोटिक सर्जरी नसती तर या शस्त्रक्रियेला सात ते आठ तास लागले असते. मुलाचे बरेच रक्त गेले असते आणि डॉक्टर इतके बारीक काम, इतक्या सफाईदारपणे करू शकले नसते, असे डॉ. प्रसाद म्हणाले. डॉ. चौधरी शिवत होते आणि डॉ. विनय यांना जागोजाग दोरा कापण्यास सांगत होते. डॉ. विनय यांनी सक्शन मशीन टाकलेल्या छिद्रातूनच एक पातळ कैची असलेल्या रोबोटिक टूलचा वापर केला आणि रोबोटचा तिसरा हात दोरा कापू लागला. अशाप्रकारे सुमारे शंभरपेक्षा जास्त टाके घालण्यात आले. आता सर्व काम संपत आल्याने डॉ. चौधरी यांनी भूल कमी करण्यास सांगितले. डॉ. चौधरी आता रोबोट मशीनचा एकेक हात बाहेर काढत आहेत. सर्वात शेवटी कॅमेरा असलेले टूल बाहेर आले. हे टूल सर्वात आधी आत गेले होते आणि डॉ. चौधरी व डॉ. प्रसाद यांचा डोळा बनले होते. आपले सर्व ‘हात’ बाहेर काढल्यानंतर डॉक्टरांनी ती चारही छिद्रे टाके घालून बंद केली. इकडे फजलही स्वत:च हळूहळू श्वासोच्छवास करत आहे. डॉक्टरांनी त्याला तोंडावाटे श्वास देणारी नळी बाहेर काढली आहे. दुपारी बारा वाजेच्या सुमारास ऑपरेशन संपले. कुठेही रक्ताचे डाग नाहीत की कसली घाण नाही. फजलला नवा जन्म मिळाला आणि त्याला कळलेही नाही.
भारतात कुठे-कुठे
13 ठिकाणी. गुडगावातील मेदांता हॉस्पिटल, दिल्लीतील अपोलो, एम्स, एस्कॉर्ट, फोर्टिस आणि राजीव गांधी कॅन्सर हॉस्पिटल, मुंबईतील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ रोबोटिक सर्जरी, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आणि एशियन हार्ट इन्स्टिट्यूट, हैदराबादेतील कि. स. इन्स्टिट्यूट ऑफ रोबोटिक सर्जरी, बंगळुरूतील मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ रोबोटिक सर्जरी, नडियाड येथील मुलजीभाई पटेल यूरोलॉजिकल हॉस्पिटल आणि पुण्यातील गॅलक्सी केअर हॉस्पिटल.

सर्वात पहिल्यांदा
दिल्लीतील एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये 2001 तर एम्समध्ये 2006मध्ये.
अमेरिकेत
एक हजारपेक्षा जास्त रोबो-सर्जन आहेत. 70 टक्क्यांहून जास्त शस्त्रक्रिया रोबोट सर्जरीने होतात.