आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहित वेमुला दलित असल्याचे सिद्ध होत नाही : आयोग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रोहित वेमुला दलित असल्याचे कागदपत्रांवरून सिद्ध होत नाही, असा अहवाल मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्थापन केलेल्या न्यायमूर्ती रूपनवाल आयोगाने दिला आहे. रोहित वेमुलाने वैयक्तिक नैराश्यातून आत्महत्या केली, अशी टिप्पणीही आयोगाने केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपनवाल आयोगाने मनुष्यबळ विकास मंत्रालयाला सादर केलेल्या अहवालात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि बंडारू दत्तात्रेय यांना क्लीन चिट दिली आहे. तसेच रोहित वेमुलाच्या मृत्यूसाठी हैदराबाद विद्यापीठ प्रशासनाला दोषमुक्त ठरवले आहे. विद्यापीठ प्रशासन कुठल्याही राजकीय दबावाखाली काम करत नव्हते, असा निर्वाळाही आयोगाने दिला आहे. वेमुलाची आई व्ही. राधिका ‘माला’ समुदायाची असल्याचा कुठलाही पुरावा नाही, असे म्हणत आयोगाने तो दलित असल्याबद्दलही शंका उपस्थित केली असल्याचे समजते.

वेमुलाला जे जात प्रमाणपत्र देण्यात आले त्याच्या समर्थनार्थ आपण ‘माला’ समुदायाचे आहोत असे त्याची आई सांगू शकली असती असेही आयोगाने म्हटले असल्याचे समजते. वेमुलाच्या आईला दत्तक घेणाऱ्या कुटुंबाने तिला तिच्या खऱ्या आई-वडिलांची नावे सांगितली नव्हती त्यामुळे तिला तिच्या खऱ्या आई-वडिलांची जात सांगण्यात आली नसावी, असा उल्लेखही अहवालात करण्यात आला आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी मात्र, वेमुलाची जात कोणती होती हे शोधून काढणे हा आयोगाच्या कामकाजाचा भाग नव्हता, असे स्पष्ट केले. त्यामुळे आम्ही अशा घटनांची भविष्यात पुनरावृत्ती होऊ नये या हेतूने केलेल्या शिफारशींवरच लक्ष केंद्रित करणार आहोत, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.

रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर मोठा राजकीय गदारोळ उडाला होता. या प्रकरणी पत्र लिहिल्याबद्दल तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी आणि कामगारमंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्यावर आरोप झाले होते.

आयोगाच्या शिफारशींत समुपदेशन यंत्रणेवर भर
आयोगाने काही शिफारशीही केल्या आहेत. फक्त विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर रिसर्च स्कॉलर्ससाठीही योग्य समुपदेशन यंत्रणा असावी यावर आयोगाने भर दिला आहे. त्याचप्रमाणे वेमुला आत्महत्या प्रकरणासारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी योग्य तक्रार निवारण यंत्रणा आणि समान संधी देणारी यंत्रणा असावी, अशी शिफारसही अहवालात करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...