आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर देशात तीव्र पडसाद, राजकारण तापले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद/ नवी दिल्ली - हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येवरून राजकारण तापले आहे. भाजपचे सर्व विरोधक एकजूट होऊन स्मृती इराणी आणि बंडारू दत्तात्रेय या केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत. या दोघांनाच आत्महत्येसाठी जबाबदार मानले जात आहे. दरम्यान, साहित्यिक अशोक वाजपेयी यांनी हैदराबाद विद्यापीठाकडून मिळालेली डी. लिट. पदवी परत करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून त्यांनी पुरस्कार परत केले आहेत.
काँग्रेसने दोन्ही मंत्र्यांना हटवण्यासाठी दबाव आणला आहे. राहुल गांधी हैदराबादेत पोहोचले आहेत. त्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची आणि रोहितच्या आईची भेट घेतली. राहुल म्हणाले, ‘कुलगुरू आणि दिल्लीतील केंद्रीय मंत्र्यांनी वेळीच कारवाई केली नाही. त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. देशात बदल घडवू इच्छिणाऱ्या युवकाला एवढे दु:ख दिले की त्याच्याकडे आत्महत्येशिवाय पर्यायच उरला नाही. त्याने आत्महत्या केली, पण तशी परिस्थिती कुलगुरू, मंत्री आणि संस्थेने निर्माण केली.’ सायबराबाद पोलिस ठाण्यात सोमवारी बंडारू दत्तात्रेय, हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू अप्पा राव इतर तिघांच्या विरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

-रोहित वेमुला याला दलितविरोध आणि मतभेद याबाबतच्या असहिष्णुतेमुळे आत्महत्या करणे भाग पडले. त्याला लेखक व्हायचे होते. मी विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ पदवी परत करण्याचा निर्णय घेतला आहे. हे अधिकारी बहुधा राजकीय दबावाखाली काम करत आहेत. विद्यापीठाने मानवी सन्मानाच्या विरोधात काम केले.
- अशोक वाजपेयी, प्रसिद्ध लेखक
दिल्ली, मुंबई, पुण्यातही निदर्शने
याप्रकरणी हैदराबादसह दिल्ली, मुंबई, पुणे, औरंगाबाद चेन्नईसह अनेक शहरांत विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. तेलंगण युवा मोर्चाने दत्तात्रेय यांच्या घराबाहेर आंदोलन केले. पुणे एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी एक दिवस उपोषण केले. गुजरात केंद्रीय विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी गांधीनगरमध्ये निदर्शने केली.औरंगाबादेत विद्यापीठ बंद पाडण्यात आले.
केजरीवाल, तृणमूलचे खासदारही हैदराबादेत
विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, ही आत्महत्या नाही तर लोकशाही, सामाजिक न्यायाची हत्या आहे. मोदींनी मंत्र्यांना हाकलावे देशाची माफी मागावी. तृणमूलचे खासदारही हैदराबादेत पोहोचले. एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनी कुलगुरूंच्या अटकेची मागणी केली आहे.
एचआरडी मंत्रालयाच्या पत्रामुळे दबाव : विरोधक
मंत्री दत्तात्रेय यांनी १७ ऑगस्ट २०१५ रोजी स्मृती इराणी यांना पत्र लिहिले होते. त्यांनी विद्यार्थी संघटनेवर देशविरोधी कृत्य अभाविप नेत्याला मारहाण प्रकरणी कारवाईची मागणी केली होती. त्याच्या उत्तरात मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सप्टेंबर ते १९ नोव्हेंबरपर्यंत पाच पत्रे लिहिली. ही पत्रे रोहित आणि इतर दलित विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने दबाव आणण्यासाठी लिहिली होती, असा राजकीय पक्ष, नेत्यांचा आरोप आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो..