नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्र 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी झकीउर रेहमान लखवीच्या पाकिस्तानातील सुटकेचा मुद्दा आगामी बैठकीत उपस्थित करणार आहे. त्याआधी भारताने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेला पत्र लिहून लखवीच्या सुटकेचा मुद्दा विचारात घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर आगामी काही दिवसांत होणाऱ्या बैठकीत या मुद्यावर चर्चा केली जाणार असल्याचे आश्वासन संयुक्त राष्ट्रांच्या वतीने देण्यात आले होते. दरम्यान ऑल इंडिया अँटी टेररिस्ट फ्रंटने लखवी आणि हाफीज सईदचे शीर धडावेगळे करणाऱ्याला 20 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच पीएम मोदींनी भारत-पाक बस सेवा थांबवण्याची मागणीही फ्रंटच्या वतीने करण्यात आली आहे.
यूएनचे आश्वासन
संयुक्त राष्ट्रांत भारताचे राजदूत अशोक मुखर्जी यांनी सुरक्षा परिषदेचे प्रमुख जिम मेकले यांना पत्र लिहिले होते. त्याच्या उत्तरात मेकले यांनी परिषदेच्या पुढच्या बैठकीमद्ये लखवीच्या सुटकेचा मुद्दा उचलण्याचे आश्वासन दिले आहे. 2008 मध्ये यूएन कमिटीने एक अहवाल दिला होता. त्यात लश्करचा दहशतवादी लखवी दहशतवादी कट रचणे, प्रशिक्षण देणे आणि अशांती पसरवण्यासाठी जबाबदार असल्याचे म्हटले होते. तसेच तो इराक आणि दक्षिण आशियातील दहशतवादी कारवायांचा प्रमुख असल्याचेही म्हटले होते.
शीर धडावेगळे करणाऱ्यास 20 लाख
ऑल इंडिया अँटी टेररिस्ट फ्रंटचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेश शांडिल्य म्हणाले की, दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीर वेगळे करायचे आहेत. त्यामुळे फ्रंटचे कार्यकर्ते लवकरच जम्मू-काश्मीरचा दौरा कऱणार आहेत. ते खोऱ्यात हाफीज सईद आणि फुटीरतावादी नेते गिलानी यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाच्या विरोधात काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्याशइवाय जम्मूच्या तुरुंगात अटकेत असलेला फुटीरतावादी नेता मसरत आलम याच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचेही ते म्हणाले. तसेच लखवी आणि सईदचे शीर धडावेगळे करणाऱ्याला 20 लाख रुपयांच्या बक्षीसाची घोषणाही त्यांनी केली. जर पाकिस्तान-भारत बस सेवा थांबवण्याची मागणी मान्य केली नाही तर, कार्यकर्ते या बसला घेराव घालत पाकिस्तानचे झेंडे जाळतील असा इशाराही त्यांनी दिला.