पणजी- गोव्याचे 22 वे मुख्यमंत्री म्हणून लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आज सायंकाळी चार वाजता शपथ घेतली. गोव्याच्या राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांनी 9 मंत्र्यांसह पार्सेकर यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. फ्रान्सिस डिसुझा यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा शपथ घेतली. तर, त्यांच्याबरोबरच रामकृष्ण ऊर्फ सुधीर ढवळीकर, दयानंद मांजरेकर, रमेश दौडकर, महादेव नाईक, दिलीप परूळेकर, मिलिंद नाईक, पांडूरंग ऊर्फ दीपक ढवळीकर आणि श्रीमती अलिना सौदानिया या आठ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्याआधी आज दुपारी साडेबारा वाजता गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी राजीनामा दिला होता.
मनोहर पर्रिकर यांनी दुपारी राजीनामा दिल्यानंतर दिल्लीतून आलेले पक्षनिरीक्षक राजीव प्रताप रूडी आणि बीएस येडियुरप्पा यांच्या उपस्थितीत गोव्यातील सर्व 24 आमदारांची बैठक झाली. मनोहर पर्रिकर हे ही या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत पार्सेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. त्याआधी आज सकाळी दिल्लीत पक्षाध्यक्ष
अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक पार पडली. यात संघाचे स्वयंसेवक असेलल्या पार्सेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. तोच कित्ता राज्यातील आमदारांनी गिरवत पार्सेकर यांची एमकताने निवड झाल्याचे रूडी यांनी जाहीर केले. दोन वाजता आमदारांची बैठक, तीन वाजता पार्सेकर यांच्या नावाची घोषणा व चार वाजता पार्सेकर यांच्यासह 9 मंत्र्यांचा शपथविधी उरकण्यात आला.
त्याआधी नाराज उपमुख्यमंत्री डिसुझा यांचे बंड थंड करण्यात भाजप नेत्यांना यश आले.
आपण ज्युनियरच्या (लक्ष्मीकांत पार्सेकर) हाताखाली काम करणार नाही असे सांगत एक तर मुख्यमंत्री होऊ अन्यथा आमदार म्हणून राहू अशी बंडाची भाषा करणा-या फ्रान्सिस डिसुझा यांनी यू-टर्न घेत पार्सेकर यांच्या मंत्रिमंडळातही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याआधीच बोलताना त्यांनी नरमाईची भूमिका जाहीर केली होती. पक्ष देईल ती जबाबदारी घेईन तसेच पक्ष ज्याची विधिमंडळाचा नेता म्हणून निवड करेल ते आपल्याला मान्य असेल असे डिसुझा यांनी म्हटले होते. लक्ष्मीकांत पार्सेकर हे माझ्यापेक्षा खूपच ज्युनियर आहेत असे डिसुझा यांचे म्हणणे होते. शुक्रवारी त्यांनी याबाबत जाहीर वाच्यता करीत सीएमपदावर दावा ठोकला होता. मात्र, त्यांचे उपमुख्यमंत्रीपद कायम ठेवत नाराजी दूर करण्यात भाजप नेतृत्त्वाला यश आले आहे.
पेशाने शिक्षक असलेले लक्ष्मीकांत पार्सेकर हे मांद्रे मतदारसंघातून सलग 3 वेळा निवडून आले आहेत. मूळचे संघ स्वंयसेवक असलेले पार्सेकर हे मुत्सद्दी राजकारणी आहेत. 2012 साली पार्सेकर गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्षपदी असतानाच पक्षाने सत्ता मिळविली होती. याचबरोबर यापूर्वी त्यांनी दोनदा मंत्रीपद भूषविल्याने प्रशासनाचा अनुभव पाठीशी आहे. मनोहर पर्रिकर यांच्या मंत्रिमंडळात ते आरोग्यमंत्री म्हणून काम पाहत होते. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पार्सेकर यांच्याबरोबरच विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र आर्लेकर आणि उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसुझा यांची नावेही आघाडीवर होती. आर्लेकर हे सुद्धा संघाचेच स्वंयसेवक आहेत. मात्र, प्रशासकीय अनुभव कमी असल्याने त्यांचे नाव मागे पडले तर डिसुझा यांच्या प्रकृतीअस्वास्थामुळे व मूळचे भाजपचे नसल्याने त्यांच्या नावावर शहांनी फुली मारल्याचे समजते. आर्लेकर व डिसुझा यांच्या तुलनेत पार्सेकर अधिक योग्य वाटल्याने मेरिटच्या आधारावर त्यांची निवड झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पुढे वाचा, गोव्यात कशामुळे घडल्या इतक्या वेगवान घडामोडी...