आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंसाचारामुळे गोरक्षण उद्देश बदनाम; कायद्याच्या चौकटीमध्ये राहून गोरक्षणाचे कार्य करा -भागवत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- गोरक्षक दलांकडून देशाच्या काही भागांत सुरू असलेल्या हिंसाचारामुळे गोरक्षण आणि गोहत्येचा मुद्दा नव्याने चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गोरक्षक दलांच्या हिंसक घटनांवर टीका केली. अशा हिंसाचारामुळे गोरक्षणाचा उद्देश बदनाम होत असल्याचे स्पष्ट करून गोहत्येला अधर्म ठरवून देशभर यावर बंदी घातली जावी, अशा शब्दांत त्यांनी गोहत्याबंदीचा पुरस्कारही केला.

महावीर जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात भागवत म्हणाले, लोकांच्या विश्वासाला तडा जाईल असे कोणतेही काम गोरक्षकांनी करू नये. हे लोकच हिंसक होणार असतील तर गोरक्षणाचा उद्देश बदनाम होतो. आज बहुतांश नागरिक गोरक्षणाच्या कार्यात उत्स्फूर्तपणे उतरले आहेत. मात्र, कायदा व घटनेच्या चौकटीत राहूनच हे काम केले पाहिजे. लोकांची मने जिंकली पाहिजेत.

अहिंसेतूनच गोहत्या बंद होईल
गोरक्षणाच्या कामाचे लोकांनी कौतुक करावे, असे कार्य व्हायला हवे. अहिंसक प्रयत्नांतूनच कायदेबदल शक्य आहे. मानसिकता बदलल्यास कायद्याशिवाय गोहत्या बंद होईल, असा आशावाद भागवत यांनी व्यक्त केला. भाजपशासित राजस्थानच्या अलवरमध्ये काही दिवसांपूर्वी गोरक्षकांनी गायी घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीला मारहाण करून ठार केले होते. या घटनेनंतर अशा अनेक हिंसक घटना उघडकीस आल्या. त्यामुळे गोरक्षक टीकेचे धनी झाले आहेत.

हा तर अधर्म, भाजप नेत्यांना आवाहन
गोहत्या अधर्म आहे. त्यावर बंदी घातली पाहिजे, असे सांगून रा. स्व. संघाची पार्श्वभूमी असलेल्या भाजप नेत्यांना उद्देशून भागवत म्हणाले, ‘अनेक राज्यांमध्ये संघाचे कार्यकर्ते सत्तेत आहेत. तिथे त्यांनी असे कायदे लागू केले पाहिजेत. अन्य सरकारेही असे कायदे बनवतील. राजकीय गुंतागुंतीमुळे हे कायदे लागू करण्यासाठी थोडा अवधी लागेल.’

तेलंगणातील भाजप आमदाराच्या वादग्रस्त वक्तव्याने वाद
राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा शिरच्छेद करू, असे वक्तव्य करून तेलंगणातील भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी वाद ओढवून घेतला. यूपीत एका एमआयएम नेत्याने व्हॉट्सअॅपवर राम मंदिराविरुद्ध टिप्पणी केल्यावर सिंह यांनी हे वक्तव्य केले. दरम्यान, हैदराबाद पोलिसांनी मजलिस बचाओ तेहरिकचे प्रवक्ते अहमज उल्ला खान यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...