आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ruckus In RajyaSabha, Opposition Shouts Slogans Against Prime Minister

पंतप्रधानांच्या वक्तव्यावरून सत्ताधारी-विरोधकांत राज्यसभेत जुंपली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशात भारताची प्रतिमा मलिन केली असल्याचा आरोप करत िवरोधी पक्ष राज्यसभेत प्रचंड आक्रमक झाले. मोदींच्या नुकत्याच पार पडलेल्या तीन देशांच्या दौऱ्यावर सभागृहात चर्चा घडवून आणावी, अशी मागणी विरोधी नेत्यांनी केली. ही मागणी सरकारने फेटाळताच सभागृहात गोंधळ झाला. कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले.

काँग्रेसचे आनंद शर्मा यांनी नियम २६७ अन्वये सभागृहाचे कामकाज तहकूब करावे, अशा आशयाची नोटीस दिली. सत्ताधारी सदस्यांनी ही नोटीस स्वीकारली जाऊ नये, अशी विनंती उपसभापती पी. जे. कुरियन यांच्याकडे केली, तर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली जदयू, सपा, माकपा व इतर पक्षांनी ही नोटीस स्वीकारून कामकाज स्थगित करावे, अशी मागणी लावून धरली. सुमारे एक तास सभागृहात यावरून गोंधळ सुरू होता. दरम्यान, सभागृह नेते व अर्थमंत्री अरुण जेटली यांनी चर्चेची मागणी फेटाळून लावताच विरोधक संतापले. पंतप्रधानांविरुद्ध त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. या गोंधळातच उपसभापती कुरियन यांनी आनंद शर्मा यांची नोटीस फेटाळल्याचे जाहीर केले.

शरद यादव यांना कानपिचक्या
सभागृहात जनता दल संयुक्तचे नेते शरद यादव यांनीही पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यातील भाषण करण्याच्या कृतीवर टीका केली होती. त्याचा समाचार घेताना जेटली यांनी १९७५ मध्ये जेपी आंदोलनाची आठवण करून दिली. त्या वेळी नेते तत्कालीन सरकारची बदनामी करत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते..
जर्मनी दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, भारताची प्रतिमा आता स्कॅम इंडियाऐवजी स्किल इंडिया होत आहे. कॅनडात बोलताना ते म्हणाले, "ज्यांना घाण करायची होती ते करून गेले, आता आम्ही ती स्वच्छ करत आहोत....'

पंतप्रधानांचा तो अधिकार
देशातील भ्रष्टाचाराचे मुद्दे परदेशात मांडायचे की नाही याचे पंतप्रधानांना स्वातंत्र्य आहे. मात्र, ही घाण स्वच्छ होऊच नये, अशी काँग्रेसची इच्छा आहे. आता चर्चा करून आपल्या काळातील घोटाळ्याची चर्चा घडवून आणण्याची काँग्रेसची इच्छा आहे काय?
अरुण जेटली, अर्थमंत्री

देशाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली
आपल्या देशाचे पंतप्रधान जेव्हा परदेश दौऱ्यावर असतात तेव्हा ते देशाची प्रतिष्ठा जपली जाईल, याचीच काळजी घेतात. हीच आपली परंपरा आहे. मात्र, मोदींनी ती धुळीस मिळवली.
आनंद शर्मा, काँग्रेस सदस्य