Home | National | Delhi | Sahitya Acadamy Award Declared To Satish Kalsekar

सतीश काळसेकर, जावेद अख्‍तर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

वृत्तसंस्था | Update - Dec 19, 2013, 05:59 AM IST

साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार यंदा मराठीतील प्रसिद्ध कवी सतीश काळसेकर यांना जाहीर झाला आहे.

 • Sahitya Acadamy Award Declared To Satish Kalsekar
  नवी दिल्ली - साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार यंदा मराठीतील प्रसिद्ध कवी सतीश काळसेकर यांना जाहीर झाला आहे. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनाही लाव्हा या उर्दू काव्यसंग्रहासाठी हा सन्मान मिळाला आहे. याशिवाय हिंदी कादंबरीकार मृदुला गर्ग, बंगाली कवी सुबोध सरकार यांचाही पुरस्कारविजेत्यांमध्ये समावेश आहे. 11 मार्च रोजी राजधानी दिल्लीत एका समारंभात पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
  अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांनी बुधवारी पुरस्कारांची घोषणा केली. विविध भाषांतील आठ काव्यसंग्रह, चार निबंधसंग्रह, तीन कादंब-या, दोन लघुकथा, दोन प्रवासवर्णने, आत्मचरित्र व एका नाटकाचा समावेश आहे. गुजराती व आसामीसाठी पुरस्कार जाहीर झाले नाहीत. ते लवकरच होतील, असे तिवारी म्हणाले.
  काळसेकर, अख्तर यांच्या साहित्य प्रतिभेचा सन्मान
  सतीश काळसेकर यांच्या ‘वाचणा-याची रोजनिशी’ या पुस्तकासाठी 2013चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘इंद्रियोपनिषद’, ‘साक्षात’, ’विलंबित’ हे कवितासंग्रह लिहिणारे काळसेकर सिद्धहस्त कवी आहेतच, आयदान-सांस्कृतिक ठेवा, कविता लेनिनसाठी, एक दोन तीन (अनुवाद), मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे (नामदेव ढसाळांच्या कविता - संपादन) लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेच्या वाङ्मयवृत्त या नियतकालिकात डिसेंबर 2003 पासून जानेवारी 2009 पर्यंत रोजनिशी हा स्तंभ काळसेकरांनी चालविला होता. यातील लेखाच्या संकलनात्मक पुस्तकाला हा पुरस्कार मिळाला आहे. ‘रोजनिशी’मध्ये पुस्तकांबद्दलची मतं अनुभव बहुसंख्येने येतात. त्याचबरोबर संगीत, सिनेमा, नृत्याबद्दलही चर्चा होते. लोकभाषांच्या शब्दसंपदेबद्दल आणि जागतिकीकरणाच्या अपरिहार्य परिणामांबद्दल ते लिहितात. नेमक्या शब्दांत पुस्तकाचं मर्म वाचकापर्यंत पोहोचवण्याचं कसब काळसेकरांकडे आहे.
  जावेद अख्तर : लाव्हा या उर्दू काव्यसंग्रहासाठी प्रसिद्ध कवी, गीतकार जावेद अख्तर यांना 2013 चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. 1971 मध्ये अंदाज चित्रपटापासून त्यांनी चित्रपटीय कारकीर्दीला सुरुवात केली. जावेद यांना 2012 मध्येही साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले होते. आतापर्यंत त्यांनी 80 चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत. पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. ‘फिव्हर’, ‘तरकश’ (कवितासंग्रह), ‘टॉकिंग साँग्स’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
  पुरस्कार हा तर वाचन संस्कृतीचा प्रतिसाद
  मला मिळालेला हा पुरस्कार वाचन संस्कृतीचा प्रतिसाद आहे. मला तो शुभसूचक वाटतो. हा पुरस्कार मला अनपेक्षित आहे. कारण माझे लेखन कादंबरी, कविता, कथा, समीक्षा अशा ठोस साहित्य प्रकारांशी निगडित नाही. वाचनप्रेम वाढवावे या उद्देशाने मी खूप साधेपणाने या पुस्तकात बोललो आहे. अकादमीने या पुस्तकाची पुरस्कार रुपाने दखल घेतली याचा मला आनंद आहे.सतीश काळसेकर, ज्येष्ठ कवी

Trending