नवी दिल्ली - साई पुजेवरून सुरू झालेला वाद आणखी गंभीर रूप धारण करण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे आता नागा साधुही या वादात पडण्याची शक्यता आहे. अलाहाबाद आणि हरिद्वार आखाड्यांच्या वतीने नागा साधुंनी शंकराचार्यांच्या मताला पाठिंबा दर्शवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी नागा साधू जमण्याची शक्यता आहे. साईबाबा देव होते याचे खंडन करण्यासाठी रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे. मात्र, अखाडा परिषदेचे माजी मुख्य महंत ज्ञानदास यांनी या मुद्यावर शंकराचार्यांवर टीका केली असून हा वाद निरर्थक असल्याचे म्हटले आहे.
धार्मिक आणीबाणी
अग्नि अखाड्याचे सेक्रेटरी गोविंदानंद ब्रह्मचारी म्हणाले की, 'ही धार्मिक आणीबाणीची स्थिती आहे. त्यामुळे नागा साधू सनातन धर्माचे रक्षक म्हणून लवकरच शंकराचार्यांच्या समर्थनार्थ एकत्र येतील. आम्ही त्यांना प्रयाग आणि हरिद्वारमध्ये जमण्याचे आवाहन केले आहे.' निरंजनी अखाड्याचे सेक्रेटरी आचार्य नरेंद्र गिरी म्हणाले की, 'आमच्या काही सदस्यांनी साई बाबांच्या मूर्ती हटवण्यास सुरुवातही केली आहे. साईभक्तांनी केलेला शंकराचार्यांना अनादर सहन केला जाणार नाही. त्यामुळे आमचे शस्त्रधारी साधू लवकरच या प्रकरणी मध्यस्थी करतील.'
नागा साधू रस्त्यावर उतरल्यास वाढणार वाद
नागासाधू वर्षभर साधनेमध्ये लीन असतात. केवळ कुंभमेळ्यास शाही स्नानासाठी ते आढळतात. मात्र, आता धर्माचे रक्षण करण्यासाठी त्यांना समोर येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशभरात सुमारे दोन लाख नागा साधू आहेत. ते रस्त्यावर उतरले तर कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
ज्ञानदास म्हणाले, सर्व निरर्थक
महंत ज्ञानदास यांनी साईबाबांच्या पुजेवरून सुरू झालेल्या वादाची गरजच नसल्याचे म्हटले आहे. जर कोणी एखाद्या खास धार्मिक गुरूची पुजा करत असेल तर, आपण त्याला तसे करण्यापासून थांबवू शकत नाही. पण शंकराचार्य स्वरुरपानंद सरस्वती यांनी यासंदर्भात विनाकारण वाद निर्माण केला आहे. माझ्या मते हिंदु धर्म अत्यंत शक्तीशाली आहे. त्यामुळे दुसरा कोणताही संप्रदाय त्याला धोका पोहोचवू शकत नाही.
फाइल फोटो : कुंभ मेळ्यामध्ये शाही स्नानाला जाणारे नागा साधू