ऋषिकेश - गेल्या काही दिवसांत
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी प्रकाशझोतात आलेल्या साक्षी महाराज यांनी आणखी एक धक्कादायक वक्व्य केले आहे. पण या वक्तव्याने सत्ताधाऱ्यांनाच अधिक धक्का बसू शकतो. मी शक्तीशाली व्यक्ती असून सरकार बनवूही शकतो आणि सरकार पाडूही शकतो असे साक्षी महाराज यावेळी म्हणाले आहेत.
एका मुलाखतीत बोलताना साक्षी महाराजांनी हे वक्तव्य केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान
नरेंद्र मोदी हे आमचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करावे. पण त्याचवेळी त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्यावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असल्याचा सल्लाही साक्षी महाराजांनी देऊन टाकला.
गेल्या काही दिवसांत वादग्रस्त वक्तव्यांबाबात साक्षी महाराजांवर अनेकप्रकारचे आरोप लागले होते. त्यानंतर भाजपने त्यांना नोटीसही दिली होती. पण तरीही उन्नावमधील एका कार्यक्रमात साक्षी महाराजांनी आणकी काही वक्तव्ये केली. काही दिवसांपूर्वी साक्षी महाराज यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटले होते. तसेच हिंदु महिलांनी चार मुलांना जन्म द्यावा असेही वक्तव्य त्यांनी केले होते. त्याचबरोबर हिंदुंचे धर्मांतर बैकायदेशीर असल्याचे घोषित करावे आणि गोहत्या करणाऱ्यांसाठी मृत्यूदंडाची तरतूद करावी, अशी वक्तव्ये करत त्यांनी वेळोवेळी भाजपला संकटात आणले आहे.
शक्तिशाली असल्याचा दावा
या मुलाखतीत साक्षी महाराजांनी आपण शक्तीशाली असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, मी एक पॉवरफुल व्यक्ती आहे. मी सरकार बनवूहू शकतो आणि सरकार पाडूही शकतो. साक्षी महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेच गेल्या वेळी हिवाली अधिवेशनात मोठ्या प्रमाणावर गदारोळ झाला होता. एवढेच नव्हे तर ओबामांनीही नुकत्याच झालेल्या दौऱ्यादरम्यान धर्मनिरपेक्षतेच्या कानपिचक्या दिल्या. पंतप्रधान मोदींनीही खासदारांना लक्ष्मण रेषा पार न करण्याचा सल्ला दिला आहे.