नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांत
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांद्वारे भाजपला अडचणीत आणणाऱ्या खासदार साक्षी महाराज यांच्यावर भाजपचे पक्षनेतृत्त्व कारवाई करण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली निवडणुकांच्या नंतर लगेचच साक्षी महाराज यांना पक्षातून निलंबित केले जाऊ शकते.
साक्षी महाराजांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत भाजपलाच आव्हान देणारे वक्तव्य केले होते. आपण ठरवले तर सरकारर बनवूही शकतो अथवा पाडूही शकतो असे साक्षी महाराज म्हणले होते. या वक्तव्यानंतर पक्षाने साक्षी महाराजांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय केला आहे.
पंतप्रधान
नरेंद्र मोदी साक्षी महाराजांवर चांगलेच नाराज असल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधानांनी सर्व खासदारांना लक्ष्मण रेषा ओलांडू नये अशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतरही साक्षी महाराजांनी वादग्रस्त वक्तव्ये करणे सुरुच ठेवले आहेत. त्यातच त्यांनी सरकार पाडण्याची भाषा करत सर्व सीमा ओलांडल्या आहेत. वादग्रस्त वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने साक्षी महाराज यांना नोटीसही पाठवली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यांबाबत दुःख व्यक्त केले होते.
कारवाईच्या भीतीने यू टर्न
दरम्यान साक्षी महाराजांनी सरकार पाडण्याच्या वक्तव्यावरून यू टर्न घेतला आहे. बुधवारी ते म्हणाले की, मोदी हे तर आमचे नेते आहेत आणि आम्ही त्यांचे सैनिक आहोत. मोदी है दैवी शक्ती असणारे आणि विकासासाठी समर्पित असे नेता असल्याचेही साक्षी महाराज म्हणाले. आपले वक्तव्य चुकीच्या रितीने सादर करण्यात आले असेही त्यांनी सांगितले. मोदींसह सर्वांनात अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर तयार करावे असे वाटत असल्याचेही ते म्हणाले.