आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sample Survey: 75 Percent Marginal Land Holder In Rural Area

नमुना सर्वेक्षण: ग्रामीण भागात ७५ टक्के अल्पभूधारक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील ७५.४२ टक्के ग्रामीण कुटुंबांकडे अत्यंत मर्यादित म्हणजे फक्त १ हेक्टरपर्यंत म्हणजेच केवळ अडिच एकर शेतजमीन आहे, तर ०.२४ टक्के कुटुंबांकडेच १० हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन आहे, असे एका सर्वेक्षणात आढळले आहे.

नॅशनल सॅम्पल सर्व्हेद्वारे जानेवारी ते डिसेंबर २०१३ या कालावधीत जमीन आणि जनावरे मालकांचे ७० वे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ही बाब समोर आली आहे. हे सर्वेक्षण सर्व देशातील ४,५२९ खेड्यांमध्ये करण्यात आले. ज्यांच्याकडे अत्यंत कमी म्हणजे ०.००२ हेक्टर एवढी किंवा त्यापेक्षाही कमी शेतजमीन असणा-यांची संख्या ७.४१ टक्के आहे. शेतीची मशागत हाच उत्पन्नाचा मोठा स्रोत असलेल्या स्वयंरोजगार कुटुंबांकडे सर्वांत जास्त म्हणजे एकूण जमिनीच्या ८१. ४ टक्के वाटा आहे.

जुलै ते डिसेंबर २०१२ या हंगाम काळात पिकांसाठी ९४.७ टक्के तर जानेवारी ते जून २०१३ या हंगाम काळात ७९ टक्के शेतजमीन वापरली. या दोन्ही हंगामांत अनुक्रमे २.८३ टक्के व १३.८५ टक्के शेतजमिनीचा वापर अकृषी कारणांसाठी करण्यात आला.

सर्वांत जास्त लागवड कडधान्याची
जुलै ते डिसेंबर २०१२ आणि जानेवारी ते जून २०१३ या दोन्ही हंगामांत सर्वांत जास्त जमीन कडधान्याच्या लागवडीखाली वापरण्यात आली. ती अनुक्रमे ५६.२१ टक्के आणि ५७.७४ टक्के एवढी आहे.

कूपनलिका, विहिरी हाच सिंचनाचा मुख्य स्रोत
देशपातळीवर सिंचनाचा मुख्य स्रोत कूपनलिका व विहिरी हाच होता. जुलै ते डिसेंबर २०१२ दरम्यान एकूण सिंचन क्षेत्राच्या ६७% जमीन तर जानेवारी ते जून २०१३ दरम्यान ७१ % सिंचन कूपनलिका आणि विहिरीच्या पाण्यावरच केले गेले.

पुराचा फटका सर्वाधिक अरुणाचलला
२०१२ मध्येज्या राज्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला त्यात अरुणाचल प्रथम क्रमांकावर आहे. अरुणाचलमध्ये २६ टक्के शेतीचे नुकसान झाले.