आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sangh BJP Behind Religion Conversion, Government Say No Connection

धर्मांतरात संघ-भाजपचा हात, घटनेशी संबंध नसल्याचा सरकारचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली / आग्रा / लखनऊ - आग्रा येथे २५० मुस्लिमांनी हिंदू धर्म स्वीकारल्याच्या मुद्द्याला राजकीय वळण मिळाले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांत या मुद्द्यावर गोंधळ झाला. राज्यसभेत विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी केली. या घटनाक्रमात संघ आणि भाजपचा हात आहे, असा आरोप विरोधी पक्षांनी लावला. मात्र त्याच्याशी काहीही देणे-घेणे नाही, असे सत्ताधारी पक्षाने स्पष्ट केले.

शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करताना बसप प्रमुख मायावती म्हणाल्या की, आग्-यानंतर जातीयवादाचा वणवा संपूर्ण देशात भडकेल. या घटनेत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा हात आहे. आग्रा येथे संघ आणि बजरंग दल यांनी मुस्लिम परिवारांचे धर्मांतर केले. त्यांना लालूच दाखवण्यात आली. हे धर्मांतर त्यांच्या मर्जीने करण्यात आले नाही. गरिबीचा फायदा घेऊन हा प्रकार करण्यात आला. अलिगडमध्ये याच महिन्यात ख्रिश्चनांचे धर्मांतर करण्यात येणार आहे. ते रोखले पाहिजे. माकपचे सीताराम येचुरी यांनीही असेच मत मांडले. काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याची मागणी केली. गोंधळ वाढल्यानंतर अल्पसंख्याक खात्याचे राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की, ज्यांनी धर्मनिरपेक्षतेच्या राजकारणाचा ठेका घेतला आहे त्यांनी धर्मनिरपेक्षतेवर आपलाच एकाधिकार नाही हे लक्षात ठेवावे.
धर्मनिरपेक्षता कायम राखणे ही आमचीही जबाबदारी आहे. ती आम्ही चांगलीच ओळखून आहोत. आग्-याच्या घटनेशी आमचे अथवा केंद्र सरकारचे काहीही देणेघेणे नाही. त्यामुळे एखाद्या विशिष्ट संघटनेचे अथवा रा. स्व. संघाचे नाव घेणे योग्य ठरणार नाही.

ख्रिसमसच्या दिवशी हिंदू संघटनांचा ‘घर वापसी’ कार्यक्रम
आग्-यात झालेल्या धर्मांतर कार्यक्रमप्रकरणी एफआयआर दाखल झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव आलोक रंजन म्हणाले की, जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले, असे सिद्ध झाले तर आम्ही आयोजकांवर कारवाई करू. दरम्यान, धर्म जागरण समन्वय विभाग आणि बजरंग दल यांनी २५ डिसेंबरला अलिगडमध्ये ‘पुरखों की घर वापसी’ कार्यक्रमाची घोषणा केली आहे. संघटनेचे नेते राजेश्वर सिंह म्हणाले की, आम्ही ४००० ख्रिश्चन आणि १००० मुस्लिमांना हिंदू धर्मात परत घेऊ.

असे आहे प्रकरण
आग्-यात सोमवारी काही मुस्लिम कुटुंबांनी हिंदू धर्म स्वीकारला होता. ‘एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यात रेशन कार्ड आणि आधार कार्ड तयार करून दिले जातील, असे आम्हाला सांगण्यात आले. पण जेव्हा आम्ही तेथे पोहोचलो तेव्हा आमचे धर्मांतर करण्यात आले,’ असे या कुटुंबांचे म्हणणे आहे.

मोदींना ‘फालतू’ म्हणणा-या बॅनर्जींनी मागितली माफी
सत्ताधारी पक्षाच्या दबावानंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी माफी मागितली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री तसेच त्यांचे नातू सिद्धार्थसिंह यांच्यावर केलेल्या टिप्पणीबाबत त्यांनी लोकसभेत माफी मागितली. ‘मोदी यांच्यासारखा फालतू पंतप्रधान यापूर्वी देशात झाला नव्हता,’ असे वक्तव्य त्यांनी केले होते. ‘लालबहादूर शास्त्री आज जिवंत असते आणि त्यांनी आपल्या नातवाला (सिद्धार्थ) पाहिले असते तर त्यांना आपल्या विवाहाबद्दल खेदच झाला असता,’ असेही बॅनर्जींनी म्हटले होते.