पाटणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'काँग्रेस मुक्त भारत' या घोषणेला उत्तर देत
शनिवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी 'संघमुक्त भारत'ची घोषणा दिली. 'उम्मीद की उडान' या परिसंवादात त्यांनी संघ आणि भाजपवर सडकावून टीका केली. लोकशाहीला बळकटी देण्यासाठी तसेच देशाची एकता आणि अखंडता अबाधित ठेवण्यासाठी भाजपच्या विरोधात सर्व शक्तींनी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले.
देशात भावना भडकावण्याचे काम सुरू आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे योगदानच नाही, तेच आज तिरंग्याच्या मुद्द्याला हवा देण्याचे काम करत आहेत. नागपूरमध्ये भगवा फडकवला जात असून देशात तिरंग्याची लढाई उभी केली जात असल्याचा आरोप नितीश यांनी केला.
आम्ही सिद्धांतावर एनडीएशी नाते तोडले होते. आमच्या गठबंधनाची पाटी कितीही मोठी दिसत असली तरी, लोकशाही टिकवणे हा आमचा सर्वांचा एकमेव उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. एकेकाळी लोहिया यांनी काँग्रेसच्या विरोधात सर्व पक्षांना एकत्र आणले होते. आता भाजपच्या विरोधात सर्व पक्षांनी एकत्र येण्याची वेळ अाली असल्याचे नितीश यांनी सांगितले.