आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sangh Starts Voter Contact Compaign For Lok Sabha Election

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघ देशव्यापी मतदार संपर्क अभियान राबवणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संपूर्ण देशात घरोघरी जाऊन मतदार संपर्क अभियान राबवण्याची व्यापक योजना तयार केली आहे. याअंतर्गत प्रत्येक नवमतदाराशी संपर्क साधून त्यांना आवर्जून मतदान करण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका पदाधिकार्‍याने याला दुजोरा देताना सांगितले की, ‘निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे या उद्देशाने घरोघरी जाऊन मतदार संपर्क अभियान राबवण्यात येणार आहे. दिल्लीमध्ये ही मोहीम एक तारखेपासून सुरू झाली असून ती 16 फेब्रुवारीपर्यंत चालेल. याअंतर्गत नवमतदारांशी संपर्क साधून त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले जाईल.18 वर्षांच्यावरील मतदारांमध्ये जागृती निर्माण करुन त्यांना सकारात्मक मतदानासाठी प्रेरित केले जाईल.’
मोदींना विहिंपचा पाठिंबा
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 300 खासदारांना लोकसभेत पाठवण्याचा निर्धार विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) ने केला आहे. अलाहाबादच्या माघ मेळ्यात विहिंपच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळाची बैठक पार पडली त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला. अयोध्येतील रामजन्मभूमीच्या मुद्दयावर कायदा बनवून तिथे मंदीराचे निर्माण करण्यासाठी लोकसभेत एकाच विचारांचे 300 खासदार पाठवणे गरजेचे असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवणे आणि काँग्रेसचे भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी देशातील गावागावात जनजागृती केली जाईल, असेही या बैठकीत विहिंप नेत्यांनी म्हटले. विहिंपचे संरक्षक अशोक सिंघलसुध्दा या बैठकीस हजर होते. 17 फेब्रुवारीनंतर देशभरात संत यात्रा काढण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.