आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- अभिनेता संजय दत्तला माफी देण्याच्या मुद्द्यावरून शुक्रवारी राजकारण चांगलेच तापले. प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांना लिहिलेल्या पत्रावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सहमती दर्शवली. मात्र, भाजपने विरोध केला असून जनता पार्टीचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी यांनी तर माफी दिली तर कायदेशीर आव्हान देऊ, असे जाहीर केले.
कायदामंत्री अश्विनीकुमार यांनी या संदर्भात राज्यपालांना पूर्ण अधिकार असल्याचे सांगितले. संजय दत्तने तसा अर्ज केला तर सदसद्विवेकबुद्धीने ते निर्णय घेऊ शकतात. यावर कुणीही भाष्य करणे योग्य नाही, असे म्हटले आहे. दरम्यान, माहिती-प्रसारणमंत्री मनीष तिवारी यांनी संबंधित विभाग यावर विचार करतील, असे म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते डी. पी. त्रिपाठी आणि सपाचे नरेश अग्रवाल यांनी संजय दत्तच्या प्रकरणी विशेष विचार करून त्याला माफी द्यावी, अशी भूमिका घेतली. भाजपचे बलबीर पुंज यांनी कोर्टाच्या निकालाचा सन्मान करावा, असे म्हटले आहे, तर सुब्रमण्यम स्वामी यांनी विरोध करताना म्हटले आहे की, संजूबाबाला माफी दिली गेली तर कलाकार आणि खेळाडूंना विशेषाधिकारातून अशा गंभीर प्रकरणांत सूट मिळू शकते, असा संदेश जनतेत जाईल. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी सुप्रीम कोर्टाने गुरुवारी अंतिम निकाल दिला. यात याकूब मेमनची फाशी कायम ठेवत संजय दत्तला 5 वर्षांची कैद सुनावली होती.
काटजू यांनी केले माफीचे आवाहन- न्यायमूर्ती काटजू यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायण यांना पत्र लिहून संजय दत्तला माफी द्यावी, अशी विनंती केली आहे. बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुरुवारी सुप्रीम कोर्टाने संजूला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. त्याने दीड वर्ष पूर्वीच तुरुंगात काढले आहे. आता साडेतीन वर्षे तुरुंगात काढावी लागतील.
बॉलीवूड म्हणते, त्याला ‘माफ करा’!- दक्षिण भारतातील सुपरस्टार रजनीकांत, अजय देवगण, रणबीर कपूर, विद्या बालन, महेश भट्ट यांनीही संजूला माफी द्यावी, असे विचार व्यक्त केले आहेत.
- बॉलीवूडचे अनेक कलाकार संजय दत्तच्या पाठीशी उभे राहिले आहेत. समाजवादी पार्टीच्या खासदार व अभिनेत्री जया बच्चन यांनी म्हटले आहे की, ‘मी स्वत: राज्यपालांना आवाहन करेन. संजूने अगोदरच खूप दु:ख भोगले आहे.’
- काटजू यांच्या आवाहनाला अभिनेते व भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही पाठिंबा दिला आहे. संजयला माफ करावे, त्याने आधीच या प्रकरणात खूप काही सोसले आहे, असे ते म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.