नवी दिल्ली - युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांचा कार्यकाळ लवकरच संपत असल्याने संघटनेची नवी टीम गठित करण्यात येणार आहे. सातव यांना डच्चू देण्यात येत असल्याच्या वृत्ताचाही काँग्रेसने इन्कार केला आहे. लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला पराभवाचा जोरदार धक्का बसल्यानंतर पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी संलग्न संघटनांची नव्याने बांधणी सुरू केली आहे.
अध्यक्ष म्हणून सातव अजून काम करत आहेत, परंतु नव्या अध्यक्षांसह नवे पदाधिकारी नेमण्याची विनंती त्यांनी केली आहे, असे काँग्रेस सरचिटणीस सुरज हेगडे यांनी सांगितले. सातव यांना काढण्यात येत असल्याचा इन्कार करतानाच नव्या टीमच्या शोधाचे काम ते करणार असल्याचेही काँग्रेसने स्पष्ट केले आहे. नव्या रक्ताला वाव मिळावा अशी
आपली इच्छा असल्याचे सातव यांनी म्हटले आहे. दोन वर्षांपूर्वीच आपण पदाचा राजीनामा दिला होता, परंतु काम करण्यास सांगण्यात आले होते, असेही सातव म्हणाले. महाराष्ट्रात काँग्रेसचे दोन खासदार निवडून आले असून, त्यात नांदेडातून अशोक चव्हाण व हिंगोलीतून सातव आहेत.