नवी दिल्ली - देशातील २०० जिल्ह्यांना कुपोषणाने ग्रासले आहे. त्यावर मात करण्यासाठीची यंत्रणा प्रभावीपणे राबवली गेली नसल्याने देशभर कमी वजनाच्या अर्थात कुपोषित बालकांची संख्या वाढली. मात्र, महाराष्ट्रात औरंगाबाद येथे कुपोषणावर होत असलेले काम लक्षणिय असल्याची माहिती बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी लोकसभेत दिली.
गर्भवती मातांमध्ये कुपोषण वाढत असल्याने बालमृत्यूमध्ये वाढ झाल्याचे गांधी यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना मान्य केले. कुपोषणाने महाराष्ट्राला ग्रासले असल्याकडे खासदार पूनम महाजन आणि श्रीरंग बारणे यांनी लक्ष वेधले. यावर गांधी म्हणाल्या, कुपोषणाची समस्या देशभरातील जवळपास २०० जिल्ह्यांमध्ये आहे. त्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती बरी आहे.
मुले कुपोषित राहू नयेत म्हणून शालेय विद्यार्थ्यांना सकस आहार पुरवला जातो. मात्र, त्यातही मतभेद आहेत. काही ठिकाणी सामाजिक संस्था, कंत्राटदारांवर आहार वाटपाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यंत्रणा आणखी सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.